गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती, अनेक मार्ग सुरु
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १५ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली आहे. पुरामुळे बंद असलेल्या अनेक मार्गावरून वाहतूक सुरु झाली असली तरी दक्षिण गडचिरोलीत पूरपरिस्थिती कायम असून काही मार्ग बंदच आहेत. गावात पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड झाली. यामुळे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करूनच भरपाई दिली जाणार आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या १० जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोटे नाल्यांना पूर येऊन अनेक मार्ग बंद झाले होते. मात्र, शुक्रवारी पावसाने उसंती घेतल्यानंतर पुराचे पाणी ओसरल्याने भामरागड-आलापल्ली, आलापल्ली-सिरोंचा, गडचिरोली तालुक्यातील चामोर्शी-गडचिरोली, गडचिरोली-आरमोरी मार्ग, अहेरी तालुक्यातील लगाम-आलापल्ली, आष्टी – चंद्रपूर मार्ग रहदारीसाठी सुरु झाले आहेत. सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक आणि पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने सदर मार्ग पूर्णतः बंद आहेत. यांसह आलापल्ली, भामरागड, लाहेरी बिनागुंडा राष्ट्रीय महामार्ग, आलापल्ली ते आष्टी मार्ग, बामणी ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग, लखमापूर बोरी ते हळदवाही आणि निझामाबाद सिरोंचा जगदलपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोमनपल्ली जवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतूकीसाठी बंद आहे.
११८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील ४९ गावातील ११८३६ नागरिकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. यात अहेरी तालुक्यातील १३, सिरोंचा तालुक्यातील ३४ व मुलचेरा तालुक्यातील २ गावांचा समावेश आहे.
पूर ओसरल्यावर रोगराईची भीती
पूर आल्यावर नदी नाले तुडुंब भरून वाहत असतात. यावेळी काठावरील सर्व घाण, कचरा, मलमुत्र, मेलेली जनावरे पुराच्या वण्यात वाहत येतात. हीच घाण गावाच्या परिसरात पसरत असते. यामुळे सर्व पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होतात. त्यामुळे पुरानंतर हगवण, हिवताप, कावीळ, डेंगू, चिकनगूनीया, ताप यासारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे गावात पूर येवून गेल्यानंतर पाणी गरम करून किंवा पाण्यात तुरटी फिरवून पाण्याचा वापर करावे, परिसरात स्वच्छता ठेवावी तसेच साथरोग असल्यास त्वरित आरोग्य विभागाला माहिती द्यावी असे सूचना जिल्हा प्रशासनाने केले आहे.