पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ जुलै
शहरातील विविध हॉटेलमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या इसमाची अज्ञात लोकांनी हत्या करून त्याचा मृतदेह पोटेगाव मार्गावरील रामनगर मधील एका नालीत फेकल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे गडचिरोली शहरात खळबळ निर्माण झाली आहे. नागेश प्रकाश यानलवार (35), असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागेश यानलवार हा मूल येथील रहिवासी असून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील आपल्या मामाकडे राहत होता. काही महिन्यापूर्वी तो गडचिरोली शहरात भाड्याच्या घरात राहून विविध हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी त्याची हत्या करून मृतदेह रामनगर परिसरातील एका नालीत फेकून दिला होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच शहरात एकच खळबळ निर्माण झाली. गडचिरोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरू आहे.