स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य जिल्ह्यात २.९८ लक्ष घरांवर तिरंगा फडकणार
नागरिकांनी संपूर्ण तीन दिवस ध्वज उभारावा - जिल्हाधिकारी, संजय मीणा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०८ ऑगस्ट
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत होत असून देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत असून गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण २.३८ लक्ष व नागरी ६० हजार असे एकूण २.९८ लक्ष घरांवर तिरंगा उभारण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ग्रामपंचायत, शाळा तर शहरी भागात नगरपंचायत कार्यालयात ध्वज उपलब्ध होणार असून ध्वज संहितेचे पालन करून नागरिकांनी संपूर्ण तीन दिवस ध्वज उभारावा, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शाळा, महाविद्यालये, क्षेत्रिय कार्यालये याद्वारे साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५४४१ शासकीय-निमशासकीय तर ५ हजार खाजगी आस्थापनांमधे तिरंगा उभारण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व गावांमध्ये व शहरांमध्ये प्रभातफेऱ्या, बॅनर, पोस्टर, ध्वनीक्षेपक सयंत्र, पथनाट्य व प्रसार माध्यमांच्या वापरातून जनजागृती करण्यात येत आहे.
९ ते १७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन
अमृत महोत्सवानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील स्वातंत्र्यकालीन माहिती अथवा ऐतिहासिक ठिकाणची माहिती तयार करणे, शालेय, महाविद्यालय स्तरावरुन निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धाचे आयोजन, जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे व ग्रंथाचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर १० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, जिल्हा मुख्यालयी ७५ फुट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. दि. १२ ते १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढणे, विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन, दि. १५ ऑगस्ट रोजी मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगी रंगाचे बलुन आकाशात सोडणे, प्रभात फेरीचे आयोजन, एन.सी.सी., एन.एस.एस. कॅडेट चे संचालन, व सायक्लोथॉन, मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.