चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा तडाखा, पुन्हा रेड अलर्ट जारी
पूर्णसत्य नेटवर्क चंद्रपूर दि १८ जुलै
मागील दहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच असून रोवणीसाठी गेलेल्या २० मजुरांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे एक घर कोसळून ४ बकऱ्या ठार तर १० बकऱ्या जखमी झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर, धान, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, जिल्ह्यात पुढील ४८ तास अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून आणखी पूरपरिस्थिती वाढल्यास नुकसानीचे पंचनामे करण्यात विलंब होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने अनेक मार्ग बंद आहेत. तर १३ हजाराहून अधिक शेतजमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अजूनही पाऊस सुरूच असून चिमूर तालुक्यातील उमा नदीला पूर आल्याने तालुक्यातील विविध ठिकाणी रोवणीसाठी गेलेले २० मजूर रविवारी पुराच्या पाण्यात अडकले. ही माहिती मिळताच जिल्हा आपत्ती निवारण टीमने घटनास्थळी पोहोचून सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. सोमवारी सुद्धा तालुक्यातील वडसी येथे शेतावर अडकलेल्या ५ लोकांना जिल्हा आपत्ती निवारण चमूच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुल तालुक्यातील चिंचाळा येथील अंबादास निकेसर यांचे घर कोसळल्याने शेजारी गोठ्यात बांधून असलेल्या दिलीप लेनगुरे यांचे ४ बकऱ्या ठार झाल्या तर १० बकऱ्या जखमी झाल्या. जिल्ह्यात पुढील ४८ तास अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून आणखी पूरपरिस्थिती वाढण्याची शक्यता आहे.
कुत्र्याला दगड बांधून नदीत सोडले
माणुसकीला लाजवेल असे कृत्य जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील दहेली या गावामध्ये घडले आहे. एका निष्पाप पाळीव कुत्र्याच्या पायाला भला मोठा दगड बांधण्यात आला. त्यानंतर तोंड ताराने बांधून नदीमध्ये फेकून देण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भातील व्हिडिओही वायरल करण्यात आला आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमध्ये निष्पाप कुत्र्याचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यात शेतमालासह नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भर पावसात धानोरा, पिपरी, मारडा या गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. व नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. तसेच पडलेली घरे, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, शेतीचे नुकसान, विविध विभागांचे नुकसान, मृत किंवा जखमी व्यक्ती, पायाभुत सुविधांमध्ये रस्ते, पूल, वीज पुरवठा, इमारतींचे नुकसान आदींची भरपाई करण्यासाठी तसेच पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात शासन निर्णयानुसार आर्थिक मदतीचे प्रस्ताव तात्काळ जिल्हास्तरावर पाठवण्याचे आदेश दिले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, तहसीलदार नीलेश गौड, तालुका कृषी अधिकारी श्री. ठाकरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व ग्रामस्थ उपस्थित होते.