चार दिवसांनंतर पावसाचे आगमन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० ऑगस्ट
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर उन्हाचे चटके जाणवायला लागले होते. वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. पिकांची गरज म्हणून शेतकरी आणि नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते. अशात सोमवारी संध्याकाळी गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने जोरदार धडक दिली. एक तासापेक्षा जास्त वेळ पाऊस बरसत होता. हा पाऊस धानासाठी पोषक ठरला आहे. धान पिकाच्या शेतीला पावसाची गरज होती. अनेकांच्या शेतजमिनी कोरड्या पडल्या होत्या. पावसाअभावी धान पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो. चार दिवसांनंतर पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणातील उकाडा नाहीसा झाला होता.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २०.८ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ४३.२ मिमी आरमोरी तालुक्यात पडला तर गडचिरोली ३३.६ मिमी, कुरखेडा १९ मिमी, चामोर्शी १२.७ मिमी, एटापल्ली ३४.९ मिमी, धानोरा ३७.९ मिमी, कोरची २७.१ मिमी, देसाईगंज २२.२ मिमी, मुलचेरा १२.८ मिमी पाऊस पडला.