वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामांची विशेष समिती मार्फत चौकशी करा
अन्यथा जनआंदोलन करणार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१२ मे
पाच सहा वर्षांपूर्वी आलापल्ली वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढतीने नियुक्त झालेल्या योगेश शेरेकर यांच्या कार्यकाळात आलापल्ली वनपरीक्षेत्रात करण्यात आलेल्या एकूण कामांची, केलेल्या खरेदी व्यवहारांची चौकशी समिति गठित करून तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि दोषी आढळणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर १५ दिवसात तात्काळ कारवाई करावी अन्यथा मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याची चेतावणी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर यांना दिली आहे.
वनक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांच्या एन ओ सी करीता एक लाख रु किमी चा दर!
गडचिरोली हा अतिदुर्गम आणि वनव्याप्त जिल्हा असल्यामुळे येथील अंतर्गत रस्ते जोडणीकरीता वनविभागाकडून एन ओ सी घ्यावी लागते. या एन ओ सी करीता वनपरिक्षेत्र अधिकारी वरिष्ठांच्या नावावर एक लक्ष रुपये प्रति किलो मीटर दराने लाचेची मागणी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वनक्षेत्रातील गौन खनिजाच्या उत्खननाच्या नावावरही मोठी लूट सुरू असल्याची माहिती एका ठेकेदाराने आपले नाव समोर येऊ न देण्याच्या अटीवर सांगितले. शेरेकर यांनी त्यांचेकडून ३० किमीच्या कामासाठी प्रस्तुत दरानुसार लाच घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले. आधीच नक्षल प्रभावित जिल्ह्यात विकामांची वानवा आहे. अशात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे विकासाला खीळ बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आलापल्ली वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या योगेश शेरेकर यांनी नियुक्ती झाली तेव्हा पासून ते आजपर्यन्त ते नियुक्त कार्यकाळात त्यांचे वनपरीक्षेत्रात शेरेकर यांचेमार्फत करण्यात आलेले एकूण कामे त्या संपूर्ण कामांची तात्काळ चौकशी करावी. व कोणत्या राऊंड मध्ये कोणती कामे केली त्या प्रतेक राऊंड मधील नियत क्षेत्रात करण्यात आलेल्या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी.आलापल्ली वनपरिक्षेत्रात ११ बीट आहेत. त्यामध्ये विद्यमान चौकीदारांसह जे चौकीदार काम करत नाही, अशा लोकांच्या नावाने सुद्धा पैसे काढल्या जातात व जे लोक कामावर येत नाही ते लोक वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे जवळचे असतात मग त्या बनावट मजुरांकडून वन कर्मचारी पैसे मागून घेतात. हे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र घडत आहे. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अतिरिक्त व्हाऊचर बनवून बनावट लोकांच्या नावे पैसे काढल्या जाणे ही शासनाची शुद्ध फसवणूक आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आलापल्ली वनविभागातील आलापल्ली तलवाडा, झमेला या तीन उपक्षेत्रातील एकूण फायर चौकीदार असतांना अतिरिक्त बोगस चौकीदार दाखवून पैशाची उचल केली काय? यासह शेरेकर यांच्या कार्यकाळात आलापल्ली वनपरीक्षेत्राला एकूण प्राप्त निधीतून कोणती खरेदी करण्यात आली, वनपरीक्षेत्रात कोणत्या कामावर कोणते मजूर होते, त्या संपूर्ण मजुराचे वाऊचर आणि दैनंदिनी तपासणी करण्यात यावी. शेरेकर यांनी केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे त्यामुळे करण्यात आलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे. आलापल्ली वनविभागातील आलापल्ली, तलवाडा, झमेला या तीन उपक्षेत्रात टि. सी. एम. ची कामे करण्यात आली आहेत. खंड क्रमांक.६०,१२,६३,७८,७९,४३,५८ या ठिकाणी कामे करण्यात आली, सदर कामे मजुरांच्या हाताने करायचे असतांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आलापल्ली, तलवाडा, झमेला या तीन राऊंड मधील वनपाल यांना हाताशी घेऊन जेसीबी च्या सहाय्याने कामे करण्यात आले, व मजुरांचे खोटे व्हाऊचर(बिल) तयार करून रककमेची अफरातफर केली असल्याचा आरोपही केला आहे.
या संदर्भात मुख्य वन संरक्षक वनवृत्त (प्रादेशिक) गडचिरोली यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. १५ दिवसांत सदर चौकशी सुरू केली नाही तर वनवृत्त (प्रादेशिक) गडचिरोली यांचे कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची चेतावणी दिली आहे. यासोबतच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी सुद्ध शेरेकर यांच्या चौकशीची मागणी केली आहे.