आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरिन’ प्रसूतीनंतर तिसऱ्या महिलेचाही मृत्यू

हलगर्जीपणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय चमुकडून तपास सुरू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.४ आक्टोंबर 

राज्यभरातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्हा देखील लागोपाठ झालेल्या तीन माता मृत्यूने हादरला आहे. महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर अत्यवस्थ झालेल्या तिसऱ्या महिलेचा देखील मंगळवारी रात्री नागपुरातील मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) असे मृत मातेचे नाव असून मुलगी सुखरूप आहे.

यापूर्वी दोन मातांचा अशाचप्रकारे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ही बाब खरी जरी असली तरी सप्टेंबर महिना वगळता गेल्या वर्षभरात या रुग्णालयात एकाही महिलेचा सिझेरीयन करताना मृत्यू झाला नाही. असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.सौ. किलनाके यांनी सांगितले.

रजनी प्रकाश शेडमाके वय,२३ रा. भानसी, ता. सावली, जि. चंद्रपूर व उज्ज्वला नरेश बुरे वय, २२ रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी (हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली), वैशाली सत्यवान मेश्राम वय, २४ रा. आष्टी यांना प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते.
तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली.
प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु
संध्याकाळी रजनी शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला नागपूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला.

दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला. तर वैशालीचा ३ ऑक्टोंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तीन मातांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थे विषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती गठीत केली असून या समितीने मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध घेणे सुरू केले आहे. नेमका हलगर्जीपणा झाला आहे काय? असल्यास दोषी कोण? यासारख्या प्रश्नांची उत्तरे ही समिती शोधून काढणार आहे.

महिला व बाल रुग्णालय प्रभारींच्या भरवशावर

शहरातील महिला व बाल रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह वर्ग एकचे पाच अधिकारी पद रिक्त आहेत. रुग्णालय प्रशासनातील हे अधिकारी प्रशासन, व्यवस्थापन आणि डिसीजन मेकर्स म्हणून ओळखले जातात. या सर्व पदांवर सध्या प्रभारी अधिकारी काम करताहेत. परिणामी महिला व बाल रुग्णालयाचे व्यवस्थापन आजारी पडले आहे.

 

समान्य प्रसुती पेक्षा सिझेरीनची संख्या जास्त

महिला व बाल रुग्णालयात १ एप्रिल पासून ३० सप्टेंबर २०२३ या सहा महिण्यांचा आढावा घेतला असता प्रसुती साठी २६८४ महिला रुगण दाखल झाल्या त्यापैकी ४७.८ टक्के म्हणजेच १२३७ महिलांची सामान्य प्रसुती झाली तर ५४ टक्के महिलांचे सिझेरीन करुन प्रसुती करण्यात आली. यावरून महिला व बाल रुग्णालयात सिझेरीन प्रसुतीचे प्रमाण अधिक आहे. या कालावधीत सहा सिझेरीन प्रसुती झालेल्या महिलांचा मृत्यू झाला. तर ६६ बालमृत्यू झाले.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!