भामरागड व अहेरी प्रकल्पातील त्या ४७ विद्यार्थ्यांच्या १० प्रवेशावर गुरुवारी होणार निर्णय
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट
आरमोरी येथील पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूलचा ‘नामांकित शाळा’ म्हणून दर्जा रद्द झाल्याने भामरागड प्रकल्पातील २५ आणि अहेरी प्रकल्पातील १८ मुले व ४ मुली अशा २२ एकूण ४७ विद्यार्थ्यांचा १० वी चा प्रवेश रखडला असल्याने त्यांच्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयुषी सिंह अतिरिक्त आयुक्त नागपूर यांनी गुरुवारी होऊ घातलेल्या बैठकीत या विद्यार्थ्यांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
उल्लेखनीय आहे की सदर विद्यार्थ्यांनी इयत्ता पहीली ते नववी पर्यंत आरमोरी येथील पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सर्व विषयांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. नामांकित दर्जा रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांचे सर्व विषय इंग्रजी माध्यमांचे असलेल्या शाळेतच समायोजन होणे अपेक्षित आहे. आदिवासी विकास आयुक्तालयासमोरही हाच प्रश्न उपस्थित झाला असल्याचे समजते. विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांनी सुद्धा त्याच शाळेत किंवा समकक्ष शाळेत भौतिक सुविधांसह प्रवेश द्यावा. अशी मागणी केली आहे.
नागपूर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त आयषी सिंह यांनी सांगितले की गुरुवारी या संदर्भात बैठक होणार आहे. त्यात सर्व ४७ विद्यार्थ्यांना समकक्ष शाळेत प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. गडचिरोली शहरात इंग्रजी माध्यमाची आदिवासी आश्रमशाळा असून या शाळेत संपूर्ण निवासी सुविधा आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांची जर सदर शाळेत प्रवेश घेण्याची तयारी असेल तर आदिवासी विकास विभाग तशी व्यवस्था करुन देईल.


