विशेष वृतान्त

कोठी – कोरनार पूल निर्माण भ्रष्टाचार प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजाद समाज पार्टीचे घेराव आंदोलन 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट 

कोठी – कोरनार पुल अवघ्या तीन महिन्यांत कोसळला त्यामागील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टी व सहयोगी पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी घेराव आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हाभरातून शेकडो नागरिक सहभागी झाले. आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी विकास युवा परिषद आणि बिरसा ब्रिगेड यांनी सक्रिय पाठिंबा देत सरकार व प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान आजाद समाज पार्टीने मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत प्रशासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. ज्या पुलाचे उद्घाटन स्वतः मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री करतात, तो पुल तीन वर्षांतच कोसळतो. त्यामुळे सदर पुलाचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघडकीस येते.  पुल कोसळल्याच्या घटनेला  २०  दिवस उलटूनही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे सरकार प्रशासन आणि मुख्यमंत्री तथा पालकमंत्री नेमके कुणाला संरक्षण देत आहेत? असा संतप्त सवाल करण्यात आला.

आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही अहवाल, प्रस्ताव किंवा पत्र व्यवहार सरकारशी केलेला नसल्याचे समोर आले. असे कां झाले यावर  कोणतेही उत्तर जिल्हाधिकारी  देऊ शकले नाही. परंतू आंदोलनानंतर  वरिष्ठ प्रशासनाशी चर्चा करून अहवाल देणार असे सांगितले.

आंदोलनस्थळी पालकमंत्री राजीनामा द्या, अधीक्षक अभियंत्यांना निलंबित करा, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनातील आक्रमक पोस्टर्सने नागरिकांचे आणि प्रशासनाचे विशेष लक्ष वेधून घेतले होते.

आंदोलनाच्या माध्यमातून कोठी – कोरनार पुल कोसळल्या  प्रकरणात अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा परवाना रद्द करावा, अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यकाळातील ५५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करावी, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशा  मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, हंसराज उराडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे आणि बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश वरखडे यांनी केले.

आंदोलनात आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, चेतन काटेंगे, महासचिव अंकुश कोकोडे, नागसेन खोब्रागडे, धनराज दामले, प्रकाश बन्सोड, किशोर उसेंडी, सावन चिकराम, प्रेम मडावी, शोभा खोब्रागडे, वनिता उसेंडी, सविता बांबोळे, मंगेश बन्सोड, सतीश दुर्गमवार, शुभम पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!