भामरागड तालुक्यातील मागील ९ वर्षापासून आदिवासी विभागांर्तगत इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतचे नियमित शिक्षण नामांकित शाळेत घेत असलेल्या २१ विद्यार्थ्यीनींना यावर्षी आयुष्याला कलाटणी देणारे १० वीचे वर्ष वसतिगृह न मिळाल्याने वाया जाते की काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मधेच आमच्या मुलींना शिकवायचे कोठे? असा प्रश्न उपस्थित करीत आमच्या पाल्यांना वसतिगृह व शाळा मिळवून द्या हो!. अशी मागणी भामरागड तालुक्यातील गरीब आदिवासी पालकांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून प्रशासनाकडे केली आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भामरागडतर्फे ९ वर्षांपूर्वी आदिवासींच्या पाल्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार भामरागड तालुक्यातील २१ मुलींची इयत्ता १ ली साठी निवड झाली. पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कुल आरमोरी येथे वसतिगृह व शाळेत प्रवेश घेण्यात आला. इयत्ता ९ वी पर्यंत त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू होते. शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता पालकांनी मुलींना आरमोरी येथे घेऊन गेले असता, वसतिगृहात मुलींना ठेवू शकणार नाही, असे सांगण्यात आले. हतबल झालेल्या पालकांनी प्रकल्प कार्यालय, भामरागड येथे तक्रार केली असता, अप्पर आयुक्त कार्यालय नागपूरतर्फे सूचना आली नसल्याचे सांगण्यात आले.
या २१ मुलींनी पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथे सी. बी. एस. ई. अभ्यासक्रमानुसार ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र इयत्ता १० वीला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम त्यांना झेपणार कसा? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. जर केंद्रीय शिक्षण अभ्यासक्रम ९ वी पर्यंत नसता तर, अन्य आश्रम शाळेत प्रवेश घेतलाही असता. हे वर्ष दहावीचे आहे व एका वर्षासाठी अभ्यासक्रम बदलला तर शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
शाळा सुरू होऊन दीड महिण्याचा कालावधी लोटला आहे, तरी मुली आपआपल्या घरीच आहेत. गावातील इतर मुले-मुली आपआपल्या शाळेत गेलेत. मग आपणच का घरी आहोत? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. यामुळे पालकांनी भारतीय राष्ट्रीय कँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी यांच्याकडे कैफियत मांडली व त्यांच्या पुढाकाराने भामरागड येथे पत्रकार परिषद घेऊन मुलींच्या शिक्षणाची आबाळ होत असल्याचे सांगितले. आदिवासी विकास विभागाने त्वरित पुढाकार घेऊन मुलींना आरमोरी येथील पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल व वसतिगृह येथे ठेवावे. अन्यथा दूसऱ्या कुठल्याही केंद्रीय शिक्षण अभ्यासक्रम असलेल्या शाळेत प्रवेश मिळवून द्यावा व मुलींचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालकांनी केली आहे. १० दिवसात या गंभीर बाबीकडे लक्ष न दिल्यास सर्व पालक भामरागड प्रकल्प कार्यालयाचे आवारात उपोषणाला बसतील असा इशारा तालुका कांग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत प्रभाकर मडावी, गणपत शिडाम, सोमसाय मांजी, राजू बाकडा, सीताराम नैताम, बाजीराव गावडे, दिवाकर सडमेक, भिका मडावी, जलमसाय मांजी, शंकर मडावी इत्यादी उपस्थित होते.