मृत्यूला संस्थाचालक आणि व्यवस्थापनाएवढेच जबाबदार तेवढेच प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी आणि कर्मचारीही दोषी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १४ ऑगस्ट
जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूला संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन जेवढे जबाबदार आहे, तेवढेच शाळांची तपासणी करणारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी आणि त्याचे अधिनस्त कर्मचारी, त्याना प्रोटेक्ट करणारे आदिवासी विकास मंत्रालय हेही जबाबदार आहे. त्यामुळे संस्थाचालकांप्रमाणेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी आणि त्याचे अधिनस्त तपासणी कर्मचारी आणि प्रकल्प अधिकारी यांचेवरही फौजदारी गुन्हा नोंदविले पाहिजे. तथा आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे प्रतिपादन मागणी शिवसेना उबाठाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी केले. ते सर्पदंशाने मृत्यू प्रकरणात जपतलाई येथील आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रशासनातले काही लोक अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि संस्थाचालक
मिळून आश्रमशाळांना भ्रष्टाचाराचा अड्डा बनवून ठेवला आहे. संस्था चालक सरकारला लुटतात अधिकारी संस्था चालकांना लुटतात. असेही ते म्हणाले. केवळ खाजगी अनुदानितच नव्हे तर प्रकल्प कार्यालयामार्फत संचालित आश्रमशाळांमधील परिस्थिती वेगळी नाही.
खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील ३ विद्यार्थ्यांनींचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले. ही बाब योग्य नाही. शाळा बंद करणे हा उपाय नाही. शाळेवर प्रशासक बसवा किंवा दुसऱ्या संस्थेला चालवायला द्या. अशी मागणी आमदार दानवे यांनी केली.
पत्रकार परिषदेला शिवसेना उबाठा चे जिल्हा प्रमुख पवन गेडाम व कार्यकर्ते उपस्थित होते.


