विशेष वृतान्त

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मानवाधिकार आयोगाची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १५ ऑगस्ट 

धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) स्वयंस्फूर्त दखल घेतली आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी समोर आली होती. त्यापैकी तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली वृत्ते आयोगाने गांभीर्याने घेतली आहेत.

वसतिगृहात पुरेशा खाटा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. एका खोलीत तब्बल ७९ विद्यार्थिनी राहत असल्याची माहितीही समोर आली आहे. सुमारे २५ वर्षांपासून हे वसतिगृह कार्यरत असून, तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

ही माहिती सत्य असल्यास विद्यार्थिनींच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असे निरीक्षण मानवाधिकार आयोगाने नोंदविले आहे. त्यामुळे आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. या अहवालात सर्पदंश झालेल्या जखमी विद्यार्थिनींची सद्यःस्थिती आणि त्यांना देण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती देण्याचे निर्देश आहेत.
या प्रकरणामुळे गडचिरोलीतील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव यावर काय उत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!