महावितरणच्या अधिकाऱ्यांना ३ किमी पायी नेताच तासाभरात पुस्कोटी उजळले
सीपीआयच्या जनसंघर्षाचे यश
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १४ ऑगस्ट
महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला अतिदुर्गम आदिवासी गावात सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी ३ किमी ची पायदळ यात्रा करायला लावली अन् काय आश्चर्य पुस्कोटी गावातील एक महीण्यापासून बंद स्थितीत असलेला वीज पुरवठा अवघ्या तासाभरात सुरू झाला. आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गाव उजळले. ही किमया केली आहे सीपीआयच्या एटापल्ली तालुक्यातील कार्यकर्ते आणि गावकऱ्यांच्या दबावाची.
एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत वांगेतुरी अंतर्गत पुस्कोटी गावात गेल्या अंदाजे एक महिन्यापासून वीजपुरवठा बंद होता. गावातील नागरिकांनी वीजपुरवठा बंद असल्यामुळे होत असलेल्या गंभीर अडचणींबाबत सीपीआय चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न महावितरणसमोर मांडण्यात आला.
पुस्कोटी हे एटापल्लीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेले दुर्गम गाव आहे. गावाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे सुमारे ३ किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभरापासून गावातील वीजपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे जीवन मोठ्या अडचणीत आले होते. वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग व संपर्क व्यवस्था, विद्यार्थ्यांचा अभ्यास, घरगुती कामे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला होता. दुर्गम भागातील नागरिकांना वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेसाठीही दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.
यासाठी कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, उपविभाग एटापल्ली यांना पुस्कोटी गावात प्रत्यक्ष नेण्यात आले. एटापल्लीपासून सुमारे ६० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वाहन जिथपर्यंत जाऊ शकते तिथून पुढे रस्ता नसल्यामुळे उपकार्यकारी अभियंता, उपविभाग एटापल्ली, कनिष्ठ अभियंता एटापल्ली तसेच त्यांची तांत्रिक टीम आणि वीजपुरवठा कार्यकर्त्यांनी सुमारे ३ किलोमीटर पायी चालत गाव गाठले. गावात पोहोचल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गावातील विद्युत यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण समजून घेतले तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून गेल्या महिनाभरापासून वीज नसल्यामुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर महावितरणकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली. अवघ्या एका तासात पुस्कोटी गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. महिनाभर अंधारात असलेल्या गावातील घरांमध्ये पुन्हा दिवे लागल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.
विजेच्या समस्येमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न
पुस्कोटी गावातील नागरिकांनी आमच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यांचा प्रश्न गंभीर असल्याने आम्ही तो गांभीर्याने घेतला. केवळ कार्यालयात बसून या दुर्गम भागातील नागरिकांचे दुःख समजणे शक्य नाही. म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गावात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. वाहन जिथपर्यंत जाऊ शकते तिथून पुढे उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या टीमनेही आमच्यासोबत ३ किलोमीटर पायी चालत गाव गाठले. नागरिकांची समस्या सुटली याचा आनंद आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार, सीपीआय


