सर्पदंशांने मृत्यू प्रकरणात कुपारलिंगो संस्थेचे अध्यक्ष, सचिवासह पाच जणांवर गुन्हे दाखल
मुख्याध्यापक आणि दोन वसतिगृह अधीक्षकाचा समावेश, तपासणी अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस आदिवासी विकासमंत्राची आश्रमशाळा आणि रुग्णालयात भेट
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट
धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस करण्यात आली असून, कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष, सचिव शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील वर्षभरात या आश्रमशाळेची तपासणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नागपूर अपर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी तीन महिन्यांत तृतीय-पक्ष ऑडिट केले जाणार आहे. जपतलई येथील दुर्घटनेनंतर संबंधित संस्थेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयाने सविस्तर अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे संबंधित अनुदानित आश्रमशाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात आली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभू सादमवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धानोरा पोलीस ठाण्यात कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष मारोतराव सैनुजी कोवासे, सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत विलासराव ताटपल्लीवार, महिला वसतिगृह अधीक्षिका भाग्यश्री ज्ञानेश्वर चिंल्लमवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर रामचंद्र भोयर या पाच जणांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नोंदीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता आश्रमशाळेत घडलेल्या दुर्घटनेत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकडे निष्काळजीपणा केल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०६(१), १२५(ए), १२५(बी), ३(५) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आश्रमशाळेच्या नियमित देखरेखीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचीही आता चौकशी होणार आहे. मागील एक वर्षात जपतलई आश्रमशाळेत तपासणीसाठी गेलेल्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान नेमक्या कोणत्या बाबी पाहिल्या, त्यांच्या अहवालात कोणत्या त्रुटींची नोंद केली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील गंभीर बाबी दुर्लक्षित राहिल्या का, याचा आढावा घेतला जाणार आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
आश्रमशाळांची सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारा – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन मुलींची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द झाल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करावी राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करताना ती छायाचित्रांसह करावी . विद्यार्थी सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता व उपस्थितीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.
ओस पडलेल्या आश्रमशाळेला आदिवासी विकासमंत्र्याची भेट ; भिंतींना कानमंत्र दिला काय!
सर्पदंशांने तीन निष्पाप विद्यार्थीनींचा जीव गेल्यानंतर मंगळवार आणि बुधवारी दुपारपर्यंत जपतलाई आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे त्यांचे पालक आपापल्या गावी घेऊन गेले. परिणामी शाळा ओस पडली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले. तिसरीकडे संस्था चालक व शाळेचे प्रमुख अधिकारी यांचे विरुद्ध गुन्हे दाखल झाले.
अशावेळी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी जपतलाई येथे जाऊन ओस पडलेल्या आश्रमशाळेला भेट देऊन तेथील पाहणी केली. यावेळी तिथे शाळेच्या भिंती आणि विद्यार्थ्यांचे काही कपडे पडले होते. ते पाहीले. त्यामुळे अशोक उईके यांनी शाळेच्या भिंतीना काही कानमंत्र तर दिला नाही ना! . अशी चर्चा गडचिरोलीत रंगली आहे.

