कोठी – कोरनार पुल प्रकरणात अधिक्षक अभियंता नीता ठाकरे यांना निलंबित करा ; अन्यथा आंदोलन
आझाद समाज पार्टीची पत्रकार परिषदेतून मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट
२९ जुलै रोजी पूरस्थितीत पाण्याच्या प्रवाहामुळे कोठी–कोरनार येथील पुल कोसळल्याच्या घटनेला १२ दिवस उलटूनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर ठोस कारवाई झालेली नाही . असा आरोप आजाद समाज पार्टीने राज्य सरकारवर केला आहे. या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी झाले होते. उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांच्या आत पुल कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांना १५ ऑगस्टपूर्वी निलंबित करावे आणि संबंधित ठेकेदारा विरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई केली. मुख्यमंत्री कार्यालयाने ज्या तत्परतेने हस्तक्षेप केला आहे. ती तत्परता कोठी – कोरनार पुलाच्या बाबतीत कां दाखवली नाही? की मुख्यमंत्री त्या पुलावर काही नागरिकांच्या मरणाची वाट पहात आहेत?. असा उपरोधिक सवाल आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात अधीक्षक अभियंत्यांकडे मोठी जबाबदारी असताना निता ठाकरे यांचा कार्यकाळ दीर्घकाळ राहिला आहे. पक्षाच्या दाव्यानुसार, त्यांना गडचिरोलीसह नागपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.गडचिरोलीपासून नागपूरचे अंतर सुमारे २०० किलोमीटर असून जिल्ह्याचा भौगोलिक विस्तारही मोठा आहे. अशा परिस्थितीत एका अधिकाऱ्याकडे चार जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार देणे कितपत प्रशासकीयदृष्ट्या योग्य आहे, असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे.या कालावधीत जिल्ह्यातील विविध रस्ते आणि पुलांच्या कामांबाबत निकृष्ट दर्जाच्या तक्रारी करण्यात आल्याचा दावाही पक्षाने केला आहे.
५५० कोटींच्या कामांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप
अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यकाळात सुमारे ५५० कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पक्षाच्या दाव्यानुसार, सुमारे ५०० कोटी रुपयांची कामे १० टक्के अधिक दराने म्हणजे जवळपास ५५० कोटी रुपयांत मंजूर करण्यात आली. या कामांच्या निविदा प्रक्रियेत देशभरातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असतानाही पाचही कामे एका विशिष्ट कंपनीला देण्यात आली. या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा केला असून, त्यासंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.
कोठी–कोरनार पुलाची मूळ मंजूर किंमत ४ कोटी ९ लाख ७० हजार रुपये होती. मात्र, डिझाईन बदलण्याच्या नावाखाली कामाचा खर्च जवळपास ८ कोटी रुपयांपर्यंत वाढवला मूळ मंजूर रकमेच्या जवळपास दुप्पट खर्च होऊनही अवघ्या तीन वर्षांत पुल कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पक्षाने म्हटले आहे. सदर कामाचे विशेष अंकेक्षण करावे.
नाडेकल येथील निकृष्ट पुलाच्या प्रकरणानंतर आता एटापल्ली तालुक्यातील ताडगाव रस्त्यावरील बंडिया नंदी पुलाला भेगा पडल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पुलांची आणि रस्त्यांची तांत्रिक तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बन्सोड यांनी केले.
कोठी–कोरनार पुलिया प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत लक्ष घालून संबंधित अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांना १५ ऑगस्टपूर्वी निलंबित करावे, पुल कोसळून १२ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकार दोषी अधिकाऱ्यांची पाठराखण करत आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे. मुख्यमंत्री यांनी तातडीने कारवाई करून हा संभ्रम दूर करावा, १५ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आजाद समाज पार्टीने दिला आहे.

