त्या तीन मुलींचा मृत्यू हा सर्पदंश नव्हे तर व्यवस्थांच्या असंवेदनशीलतेचा दंश
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १२ ऑगस्ट
पूर्णसत्य विश्लेषण
धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंश मृत्यू प्रकरणाने राज्यात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
दंश केलेल्या त्या सापाला तर मारून टाकण्यात आले. असं म्हणतात की सापाला ऐकू येत नाही. केवळ स्पंदनाच्या हालचाली वरुन तो दंश करतो. आणि हा सापाचा निसर्ग प्रदत्त जन्मजात स्वभाव आहे. परंतू व्यवस्थांमधल्या माणसांचे काय? त्यांना नाक, कान, डोळे यांसह डोके आणि त्यात बुद्धीही दिली आहे. माणसाला जन्मजात सर्वांची सुरक्षा करण्याची निसर्ग प्रदत्त देणगी आहे. परंतू व्यवस्थांमधल्या माणसांच्या संवेदना मेल्या असल्याचे चित्र स्पष्ट पणे समोर येते. त्यामुळे जपतलाई येथे घडलेले मृत्यू हे सर्पदंशाचे नसून व्यवस्थांमधल्या संवेदनाहीनतेच्या घोर विषारी दंशाचे मृत्यू आहेत. हे स्पष्ट आहे.
साप तर मारुन टाकला. आता पाळी आहे ती या संवेदनाहीन अत्यंत जहाल विषारी व्यवस्थांमधल्या स्वार्थी दंश करणाऱ्यांची. त्या दंश करणाऱ्या सापाप्रमाणेच यांनाही सामान्य लोकांच्या तावडीत देऊन मारुन टाकावे लागेल. तेव्हा कदाचित इतर दंशकर्मी यातून काहीसा बोध तरी घेतील.
आता व्यवस्थांवर नागरिकांनाच अंकुश ठेवावा लागेल
साधारणतः व्यवस्थांवर अंकुश ठेवण्यासाठी वरिष्ठ व्यवस्थांचे निर्माण केले आहे. संवैधानिक लोकशाहीत कनिष्ठांवर वरिष्ठांचा अंकुश आणि त्या वरिष्ठांवर न्यायालयाचा अंकुश. न्यायालयावर संसदेचा आणि यासर्वांवर लोकांचा अंकुश ही सर्वात मोठी नियंत्रक प्रणाली आहे. त्यामुळे देशातील सर्व सामान्य लोकांनी आपल्या अंकुशाचे सामर्थ्य वापरून व्यवस्थांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षमताधिष्ठीत नागरिकांना जागरणासाठी पूढे यावे लागेल.


