राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्याचा परवाना काळ्या यादीत टाका – माजी डॉ. देवराव होळी यांची यांची मागणी
गोंडवाना चे कुलगुरू सह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १५ जुलै
भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्याचा परवाना काळ्या यादीत टाकण्यात यावे, यासह जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.
माजी आमदार डॉ. होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना , गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी व १३० डी च्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, काम पूर्ण होण्यास होणारा विलंब आणि वारंवार होणारे अपघात ही गंभीर बाब असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्याचा परवाना काळ्या यादीत टाकावा तसेच उर्वरित कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करावे. असे म्हटले आहे.
यासह जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आलेल्या रानटी हत्तींमुळे नागरिकांच्या जीवित व शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या हत्तींना कायमस्वरूपी गडचिरोली जिल्ह्याबाहेर स्थलांतरित करण्यासाठी शासनाने तातडीने स्थायी उपाययोजना कराव्यात, चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने गोड्या पाण्यातील झिंगा तसेच इतर उच्च मूल्याच्या मत्स्य प्रजातींच्या संवर्धनासाठी अभिनव मत्स्यशेतीचा विशेष पायलट प्रकल्प उभारण्यात यावा. या प्रकल्पासाठी शासनाच्या ताब्यातील अधिग्रहित जमीन नाममात्र दराने दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात यावी. अशा प्रकारच्या अनेक मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सादर करण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

यासोबतच डॉ. होळी यांनी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, साबां विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे सह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विविध विकास कामांच्या संदर्भात चर्चा करुन प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या मॅराथॉन प्रशासकीय भेटीबद्दल जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे.


