एटापल्ली तालुक्यातील कुंडमजवळ नक्षली बॅनर-पत्रके आढळली ! नागरिकांनी कंपन्या, ड्रोन सर्वेक्षणास सामुहिक विरोध करावा, न केल्यास परिणाम भोगावे लागतील, चेतावणी ; मार्क्सवादी च्या नावाचे पत्रक असल्याने वैधतेवर प्रश्नचिन्ह
मार्क्सवादाच्या नावावर जिल्ह्यात नक्षलवादी सशस्त्र चळवळ नव्याने उभी करण्याचा प्रयत्न तर नाही ना?
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली बुर्गी उपपोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंडम या गावाजवळ रविवारी नक्षलवादी कॉमरेड अशोक च्या नावाची काही पत्रकं आणि एक बॅनर आढळून आले . यात नागरिकांनी कंपन्या, ड्रोन सर्वेक्षणास सामुहिक विरोध करावा, न केल्यास परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणी देण्यात आली आहे. यामुळे मार्क्सवादाच्या नावावर जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र नक्षलवादी चळवळ सक्रिय करण्याचा प्रयत्न तर नाही ना? . अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून पत्रकं व बॅनर ताब्यात घेऊन संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
लोकांच्या डोक्यातून नक्षलवाद अद्याप गेलेला नाही.
कुंडम या गावाजवळ टाकण्यात आलेल्या पत्रकात कॉमरेड अशोक मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असा उल्लेख असल्यामुळे या पत्रकाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. उल्लेखनीय आहे की नक्षलवादी पत्रकांमध्ये कम्युनिस्ट पार्टी माओवादी असा उल्लेख असतो. मागील दहा – पंधरा वर्षांच्या काळातील नक्षलवाद्यांच्या पत्रकांमध्ये ‘माओवादी’ असाच उल्लेख आला आहे.
पत्रकातील भाषा जरी नक्षलवादी पद्धतीची असली तरी त्यात भाषेची बरीच तफावत आहे. त्यामुळे हे पत्रक आणि मजकूर हा कुणीतरी स्थानिक नागरिक ज्याला अजूनही अशा प्रकल्पांना विरोध व्हावा असे वाटते. त्याने हा उद्योग केला असावा. असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस याची सत्यता लवकरच समोर आणतीलच. परंतू लोकांच्या डोक्यातून नक्षलवाद अद्याप गेलेला नाही. हे मात्र यानिमित्ताने स्पष्ट होताना दिसत आहे.
घटनास्थळी सापडलेल्या पत्रकांमध्ये स्वतःला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कॉमरेड अशोक असल्याचा उल्लेख करत विविध कंपन्यांविरोधात स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ओमसाई, नेचरल कंपनी, सनफ्लॅग आणि इतर प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ, सरपंच आणि पोलीस पाटील यानी या कंपन्यांना विरोध करावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकांमध्ये कंपन्यांमुळे जल, जंगल आणि जमीन धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आला असून भविष्यात स्थानिकांच्या अस्तित्वावर संकट येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कंपन्यांना समर्थन करणाऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीदेखील देण्यात आली आहे.
याशिवाय सनफ्लॅग प्रकल्प, हेडकसा–कुदरी–मोहरली परिसरातील नेचरल कंपनी, जेएसडब्ल्यू प्रकल्प तसेच खेमरागडी–पिपली बुर्गी परिसरातील प्रस्तावित ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत ते तातडीने बंद करण्याची चेतावणी पत्रकातून देण्यात आली आहे.
सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी कारवाया मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असतानाच, कुंडम गावाजवळ आढळलेल्या या बॅनर व पत्रकांमुळे नक्षलवादी हालचालींबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील बॅनर आणि पत्रके जप्त करून तपास सुरू केला आहे. तसेच परिसरातील जंगलभाग आणि संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था व शोध अभियान वाढविण्यात आले आहे.
हा कंपन्यांच्या अंतर्गत संघर्षातून निर्माण केलेला प्रकार
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ही राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. आणि तो अशा प्रकारची पत्रकबाजी करीत नाही. सदर पत्रामध्ये कुठेही माओवाद किंवा नक्षलवाद असा उल्लेख नाही. त्यामुळे हे पत्रक फेक आहे. सध्या दक्षिण गडचिरोली मध्ये खाण विषयावरून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीला येथे स्थान मिळू नये यासाठी दुसऱ्या एखाद्या कंपनीने आपल्या दलालामार्फत असे फेक पत्रक व बॅनर लावून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीसांनी या पत्रकाची सखोल चौकशी करावी.
– कॉ अमोल मारकवार, जिल्हा महासचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली



