सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा !
सहा विद्यार्थी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल; दोन गंभीर विद्यार्थी गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १० जुलै
चामोर्शी तालुक्यातील सोनापूर येथील राजीव गांधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सहा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार व जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती तुलनेने गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
शाळेत पाणी पिल्यानंतर डोके दुखू लागले, चक्कर आली आणि आम्ही खाली पडलो, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.संबंधित शैक्षणिक संस्था ही चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या संस्थेशी संबंधित असून, परिसरातील स्वच्छतेचा अभाव तसेच पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता न केल्यामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व युवा जिल्हाध्यक्ष विकी खोब्रागडे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची विचारपूस केली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची विनंती केली.
दोषींवर कठोर कारवाई करा : आसपा
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, शिक्षणाधिकाऱ्यांनी घटनेची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निष्काळजीपणा करणाऱ्या महाविद्यालयावर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.



