विशेष वृतान्त

भूमी अधिग्रहणाविरोधातील आंदोलनाला नवे वळण : स्थानिक आमदाराच्या उपरोधिक व अरेरावीच्या भूमिकेने संतप्त ग्रामस्थ व विद्यार्थी जिल्हा प्रशासनाच्या दालनात

आमदार निधीमधून शैक्षणिक साहित्य वितरणाच्या बहाण्याने विमानतळासाठी गुरवळ्यात अज्ञात इसमांकडून पुन्हा एकदा छुप्या सर्वेक्षणाचा प्रयत्न

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १३ जुलै 

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूमी अधिग्रहणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे. मागील १४ दिवसांपासून शाळेत न जाता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी पालकांसह सोमवारी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दूरध्वनीवर उपरोधिक व अरेरावीच्या भाषेत संवाद साधल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकरी व विद्यार्थ्यांनी केला असून, या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्राप्त माहितीनुसार आज सोमवारी गुरवळा गावामध्ये चारचाकी वाहनातून दोन व्यक्ती दाखल झाले.त्यांनी गुरवळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काही शुटींग करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा अमरावती येथील एका आमदाराच्या निधीतून शाळेसाठी शैक्षणिक साहित्य वितरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या भेटीमागील उद्देशाबाबत ग्रामस्थांच्या मनात संशय निर्माण झाला. अधिक चौकशी करताच ते आपल्या वाहनातून पसार झाले. दोघांच्या चौकशी दरम्यान गुरवळाचे उपसरपंच अनिल कोठारे यांनी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता आमदार डॉ. मिलिंद नरोटेे यांनी, “तुमच्या गावातील ३०० एकर जमीन विमानतळासाठी विकली आहे, मग आता शेतीवर अधिकार कसा सांगता? विमानतळ का होणार नाही” अशा स्वरूपाचे उपरोधिक व अरेरावीच्या भाषेत वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी थेट गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडत निवेदन सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मंगळवार पासून शाळेत जाणार असल्याचे सांगतानाच भविष्यात विमानतळासाठी कोणीही पूर्वसूचना व पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण किंवा अन्य कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास शाळा पून्हा बंद पाडू असा इशारा दिला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हवा तसा रिस्पॉन्स दिला नाही,असे ग्रामस्थांनी सांगितले. निवेदनात शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सुरू असलेल्या भूमी अधिग्रहणाशी संबंधित हालचाली तात्काळ थांबवाव्यात, प्रभावित गावांतील नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी ठोस भूमिका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

उल्लेखनीय आहे की विमानतळासाठी प्रस्तावित भूमी अधिग्रहणाच्या कक्षेत असलेल्या राखी, शिरपूर, गुरवळा आणि हिरापूर येथील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या मुलांनीही सक्रिय पाठिंबा देत मागील १४ दिवसांपासून शाळेत जाण्यास नकार दिला आहे. आपल्या पालकांची उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती वाचविण्यासाठी हा लढा असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आपण असे कोणतेही वक्तव्य केले नाही

मला दुपारी गुरवळ्याचे उपसरपंच अनिल कोठारे यांचा कॉल आला असता मी त्यांना काही बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यात उपरोधिक व अरेरावीची कोणतीही भाषा नव्हती. माझ्या मतदारसंघांतील नागरीकांसोबत मी असे वागू शकत नाही. त्यांना याचा विपर्यास करायचा असेल तर तो त्यांचा विषय आहे.
– डॉ. मिलींद नरोटे, आमदार गडचिरोली
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!