विशेष वृतान्त

गडचिरोली शहरातील जलसंकटावर मात करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांचा पब्लीसीटीवर भर

कांग्रेस नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी केली पोलखोल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३ जून 

गडचिरोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र आटल्यामुळे तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या अध्या आणि पाणीपुरवठा सभापती यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला ताबडतोब सोडण्यात यावे अशी मागणी केली. यासोबतच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या परिघात वैनगंगेवर बंधारा बांधण्याचे कामही सुरू केले असल्याचे सांगितले. काल मंगळवारी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री आणि सह पालकमंत्री यांनी गडचिरोलीच्या जलसंकटाची दखल घेत गोसेखुर्द धरणातून वैनगंगेत २५ टीएमसी पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याचे आदेश दिले. त्याची संबंधित प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती शेअर करीत गडचिरोलीचे नगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा सभापती यांनी आपण फार मोठा तीर मारला असल्याचा आव आणत समाज माध्यमांवर व जोरदार पब्लीसीटी सुरू केली. आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते, हे विसरलेले दिसले की जनतेने त्यांना याच कामासाठी निवडून दिले आहे. 

या पब्लीसीटी च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली नगरपरिषदेतील कांग्रेसचे नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी बंधारा बांधकामाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करून नगरपरिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणत सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली आहे. देशमुख यांनी बंधारा बांधकाम हे अद्याप पूर्ण झालेले नसून सदर बंधारा केवळ मातीचा बनवण्यात येत आहे. त्याच्या कामाची गती अत्यंत संथ आहे. कामाच्या ठिकाणी केवळ एक जेसीबी व एक ट्रक कार्यरत आहे. सध्या मान्सूनच्या पावसाला फक्त आठवडा शिल्लक असून गोसेखुर्द चे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा वेळी हा मातीचा अर्धवट बंधारा तग धरून टिकून राहू शकेल काय? आणि टाकीच्या परिसरात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी कामात येईल काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 

हा तर भ्रष्टाचाराचा बंधारा! 

कोणत्याही आस्थापनेसाठी विविध विषयांवरील नियोजन हे योग्य वेळी केले पाहिजे असा संकेत आहे. गडचिरोली नगरपरिषदेच्या क्षेत्रात विशेष करून उन्हाळ्यात नागरिकांच्या पाण्याची गरज किती, त्यासाठी कोणत्या उपाययोजना केव्हा केल्या पाहिजेत याचे भान असायला हवे होते. पाण्याच्या टाकीच्या परिसरातील जलस्तर वाढवण्यासाठी आवश्यक असलेला बंधारा कसा आणि केव्हा बांधून पूर्ण व्हायला हवा. त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज होती. मात्र जून महिन्याच्या ३ तारखेपर्यंत तो जर अर्धवटच असेल. तर खरोखरच त्याचा विहीत उद्देशासाठी उपयोग होणार आहे काय? आणि याचे उत्तर जर नाही असेल तर या बंधाऱ्यावर होणाऱ्या खर्चाचे काय? हा भ्रष्टाचाराचा बंधारा ठरणार नाही तर काय? 

नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी अनेक वेळा नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविषयी आवाज बुलंद केला आहे. यावेळी सुध्दा त्यांनी भ्रष्टाचाराच्या या बंधाऱ्याचे प्रकरण पुढे आणून लोकसेवक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!