विशेष वृतान्त

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आयोजित ठिय्या आंदोलनास राजकीय पक्षांसोबत विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३ जून 

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गुरुवार ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कांग्रेसचे शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विश्नेवजीत कोवासे यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या ठिय्या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी, शिवसेना (उबाठा) सह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. यात कुणबी समाज संघटना, तेली समाज, सर्व वर्गीय कलार समाज संघटनेचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा वारंवार विरोध असतानाही एमआयडीसी, विमानतळ तसेच इतर विविध प्रकल्पांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांशी कोणताही विचारविनिमय न करता सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सुपीक जमिनी अधिग्रहित करणे म्हणजे शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी करीता भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिले आहे. भेंडाळा व परिसरातील सुपीक शेतजमीनींचाही यात समावेश आहे.

या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र,  सरकार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही. तसेच, गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाही, त्यांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशीही मागणी आहे.

या सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवार ४ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी  केले आहे.

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी एक पत्रक काढून त्यांचेसह संपूर्ण जिल्हा काँग्रेस या ठिय्या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!