विशेष वृतान्त

गडचिरोलीत 100 च्या बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला चौघांना अटक; नागपुरात छपाई

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १८ मे

गडचिरोलीतील रहिवासी असलेल्या आणि नागपुरात राहात असलेल्या दोन भावंडांनी नागपुरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये चक्क बनावट नोटा छपाई करून त्या गडचिरोलीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. गडचिरोली पोलिसांनी नागपुरात राहात असलेल्या त्या दोन भावंडांसह इतर दोन जणांना अटक केली. ते या पद्धतीने चार वर्षांपासून बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपी उच्चशिक्षित

मयूर लक्ष्मीकांत डोईजड (31 वर्ष) आणि आदित्य लक्ष्मीकांत डोईजड (26 वर्ष) अशी नोटांची छपाई करणाऱ्या भावंडांची नावे आहेत. त्यांच्यापैकी मयूर हा सिव्हिल इंजिनिअर आहे, तर आदित्य हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. गडचिरोलीकर असलेसे हे दोघे भाऊ नागपुरात प्लॅट भाड्याने घेऊन राहात असताना त्यांना नोटा छपाई करून झटपट पैसे कमविण्याची कुबुद्धी सूचली. त्यासाठी तिथेच त्यांनी नोटांची छपाई करण्यासाठी कलर प्रिंटर, बॅान्ड पेपर, कटर आणि इतर साहित्य जमवून बनावट नोटांची छपाई करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.

गेल्या ११ मे रोजी कारगिल चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये १०० रुपयांच्या २१ नोटा प्रमोद टिकाराम कोवे (२३ वर्ष, रा.हळदा, ता.ब्रह्मपुरी) याने जमा करण्याचा प्रयत्न केला. पण नोटा बनावट असल्याने त्या एटीएम मशिनने स्वीकारल्या नाही. दरम्यान मशिनने त्या नोटा का स्वीकारल्या नाही म्हणून प्रमोद कोवे याने बँकेकडे संपर्क केला असता त्या नोटा बनावट असल्याचे दिसून आले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक प्रतिक अनासने यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कोवे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ते पैसे पानटपरी चालक आदित्य रेचनकर याच्याकडून घेतल्याची माहिती दिली.

चार वर्षांत किती नोटा छापल्या?

पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढत या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बनावट नोटा बनविणाऱ्या दोन बंधूंना नागपुरातून अटक केली. याशिवाय बनावट नोटा एटीएम मशिनच्या माध्यमातून आपल्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यासह पानठेला चालक रेचनकर यालाही ताब्यात घेतले. नागपुरातील छाप्यात ५० ,  १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटासुद्धा जप्त करण्यात आल्या. चार वर्षांपासून हा बनावट नोटांचा धंदा सुरू असल्याने डोईजड बंधूंनी यापूर्वी अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चारही आरोपीना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने आरोपींची पाळेमुळे शोधण्यास मदत होणार आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!