गडचिरोली जिल्ह्यात उद्योगातून रोजगार निर्मितीचे भीषण वास्तव ; सुरजागड लोहखाणीत २ स्थानिक अधिकाऱ्यांसह केवळ ८८ लोकांनाच मिळाला रोजगार
सरकारच्या रोजगार देण्याच्या दाव्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली पोलखोल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ फेब्रुवारी
राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगात वीस हजार कोटींच्या गुंतवणुकीतून मोठ्या रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखवले. मात्र यातील वास्तव हे अत्यंत भीषण आहे. सुरजागड लोह खाणीच्या उद्योगातून ५ हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा सरकारचा दावा खोटा असून प्रत्यक्षात तीन हजार पाचशे लोकांना तात्पूरते रोजंदारीवर काम मिळाले आहे. यात केवळ पाचशे अकरा स्थानिक साधे कामगार असून सरळ भरती मध्ये एकूण ८८ लोकांना काम दिले आहे. यातही गडचिरोली जिल्ह्यातील केवळ २ अधिकाऱ्यांना रोजगार दिल्याची माहिती महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे सरकार काही उद्योजकांची मर्जी सांभाळण्यासाठीच उद्योगात गुंतवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालय, आदिवासी विकास विभागाचे वस्तीगृह, आश्रमशाळा कोनसरी फिल्टर प्लॅन्ट यासह आणखी काही ठिकाणी भेट दिली.
आढाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत शिंदे सरकार वर सडकुन टीका केली. ते म्हणाले की जिल्ह्याची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. २१२ गावांना कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही, जिल्हा रुग्णालयात एम आर आय मशीन नाही, वन हक्काचे दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत, ८८ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही जिल्हा परिषदेचे ७५ टक्के असते बनलेच नाहीत, खनिज संपत्तीच्या वाहतुकीवर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू असून कोट्यवधींच्या खनिज संपत्तीची लूट होत आहे. भारनियमनाची स्थिती गंभीर असून संबंधित विभागाकडून सौर ऊर्जेबाबत जागरूकता केली जात नाही. स्थानिकांना रोजगार नाही, जिल्ह्यात कुशल कामगार असल्याचे कारण सांगितले जाते परंतु कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाबाबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला पत्रकार परिषदेला किशोर पोतदार, वासुदेव शेडमाके, छायाताई कुंभारे, शिवाजी झोडे, विजय कदम यांचे सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना फटकारले
विरोधी पक्षनेते दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या स्थितीची समीक्षा केली. यावेळी प्राप्त माहितीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या एकूणच कार्यप्रणाली वर तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दिलेल्या वागणूकीवरुन आणि चेक पोस्ट रस्त्यांची दुरवस्था यावरुन त्यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना फटकारले.