गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीचा गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना फटका
बी.एड. अभ्यासक्रमाचा पेपर स्थगित
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १० ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सुरु असेलल्या अतिवृष्टीचा फटका गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना बसला. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्याने बुधवारी होणारा पेपर रद्द करण्यात आला. हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.
मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. बुधवारी गोंडवाना विद्यापीठाचे बीएड अभ्यासक्रमाचे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड कॉम्पुटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन सेम-१ आणि एज्युकेशन सेम-२ या विषयांची परीक्षा होती. मात्र, रस्ते बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विद्यापीठाने पेपर रद्द केला. जुलै महिन्यात आलेल्या पुराने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. पावसाने काही दिवस उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा रोवणी केली होती. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.
जिल्ह्यात १ जून ते आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या १६१.४ टक्के म्हणजेच १२५३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६१.४ मिमी पाऊस पडला. यात कोरची तालुक्यात सर्वाधिक १६६.६ मिमी, कुरखेडा ११६.५ मिमी, देसाईगंज ९५.२ मिमी, आरमोरी ८१.७ मिमी, गडचिरोली ६३.२ मिमी, धानोरा ६४,१ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यातील सर्व सर्कल मध्ये पावसाने हजेरी लावली. बेडगाव सर्कल मध्ये सर्वाधिक २०७.६ मिमी पाऊस झाला. झालेल्या मुसळधार पावसामुळे आरमोरी – गडचिरोली, गडचिरोली-चामोर्शी, आष्टी – गोंडपिंपरी, गडचिरोली – माडेमूल, कूंभी, तसेच पोर्ला- नवरगाव, साखरा- चूरचूरा, चूरचूरा-नवरगाव, आलापल्ली-भामरागड लाहेरी बिनागुंडा, आरमोरी रोड ते जोगीसाखरा, आरमोरी ते रामाळा (वैरागड), आरमोरी रोड ते ठाणेगाव मार्ग बंद आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासाकरीता गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून गोसेखुर्द धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे वैनगंगा तसेच प्राणहिता, गोदावरी या नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.