१० लाखांचे बक्षिस असलेल्या दोन महिला माओवाद्यांचेआत्मसमर्पण
आजपर्यंत ६९३ माओवाद्यांची शरणागती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ८ जानेवारी
मंगळवारी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर १० लक्ष रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन महिला माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कंपनी क्र. 10 पीपीसिएम/सेक्शन कमांडर, वय 36 वर्ष, रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली ची शामला झुरु पुडो ऊर्फ लीला व भामरागड दलम सदस्य २४ वर्षीय काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी रा नेलगुंडा अशी त्यांची नावे आहेत.
शामला झुरु पुडो ऊर्फ लीला ही २३ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे.तीने २००२ मध्ये चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून काम केले. कंपनी क्र. ४ मध्ये सन २०१० पर्यंत काम केले.आत्मसमर्पण करतेवेळी ती कंपनी क्र.१० मध्ये सेक्शन कमांडर या पदावर कार्यरत होती.या कार्यकाळात तिच्यावर आजपर्यंत एकुण ४५ गुन्हे दाखल असून त्यामध्ये २१ चकमकी, ६ जाळपोळ, व १८ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी ही जानेवारी २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये भरती होऊन आजपावेतो कार्यरत होती तिचेवर ८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ४ चकमकी १ जाळपोळ, व ३ इतर गुन्ह्रांचा समावेश आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शामला झुरु पुडो हिला एकुण साडेपाच लाख व काजल वड्डे हिला साडेचार लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. आजपर्यंत एकुण ६९३ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.