आपला जिल्हामहाराष्ट्र

जहाल माओवादी महिला ताराक्का सह अन्य दहा माओवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड मोठी घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१ जानेवारी २०२५

मागील ३८ वर्षापासून नक्षलचळवळीत असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह आज ११ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात १ डीकेएसझेडसीएम, ३ डीव्हीसीएम, २ एसीएम व ४ दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ८६ लाख ५ हजार रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला.

दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा डीकेएसझेडसीएम तथा केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी, सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी, डीव्हीसीम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी(डीव्हीसीएम), अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राही दलम व त्याची पत्नी सम्भा पांडू मट्टामी उर्फ बंडी (एसीएम डी.के.झोन डॉक्टर टीम), वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला (एसीएम भामरागड दलम), निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, सदस्य कंपनी क्रमांक १०, शशिकला पतीराम धुर्वे पश्चिम सबझोनल प्रेस टीम सदस्य, सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर ३२ यांचा आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांमध्ये समावेश आहे.

संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे नक्षल्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत, असे फडणवीस म्हणाले. जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग करीत असलेल्या विकास कामांमुळे मागील चार वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. याप्रसंगी विविध चकमकींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

६२ वर्षीय तारक्का नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तसेच दंडकारण्य विभागाची मेडिकल टीमची इंचार्ज होती. अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील मूळ रहिवासी असलेली तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिची प्रचंड दहशत होती. अनेक चकमकी आणि खुनांमध्ये तिचा सहभाग होता. ८ नोव्हेंबर २०१० रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांच्या मध्ये झालेल्या चकमकीत १७ पोलिस शहीद झाले होते. या चकमकीचे नेतृत्व तारक्काने केले होते. शिवाय त्याचा व्हीडिओही तारक्काने त्यावेळी व्हायरल केला होता. या चकमकीच्या वेळी नक्षल्यांनी सामान्य महिला व पुरुषांच्या वेशभूषेत पाने तोडत असल्याचे भासवून पोलिसांवर हल्ला केला होता. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमधील आदिवासींमध्ये तारक्का सामान्य महिलेसारखी वावरत असे. त्यामुळे तिच्यावर कुणी संशयही घेत नसे. परंतु वय वाढल्याने मागील काही वर्षांपासून ती अबुजमाडमध्ये वास्तव्यास होती.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एक कोटी तीन लाखाचे बक्षिस जाहिर केले होते. मागील एका वर्षात आज आत्मसमर्पित झालेल्या ११ माओवाद्यांसहित एकुण ३१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!