आपला जिल्हाविशेष वृतान्त

गडचिरोली जिल्ह्यात ९७२ बुथवर ८ लाख १९ हजार ५७० मतदार निवडणार तीन आमदार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ आक्टोंबर 

काल निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. आज गडचिरोली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ८ लाख १९ हजार ५७० मतदार ९७२ मतदान केंद्रावर आपल्या मताधिकाराचा हक्क बजावतील अशी माहिती दिली.

६७ आरमोरी,६८ गडचिरोली आणि ६९ अहेरी अशी जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यात आरमोरीत २,६२१६८ , गडचिरोलीत ३०६४१७ तर अहेरी विधानसभेत २५०९८५ मतदार आजमितीस आहेत. या मतदार संख्येत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तारखेपर्यंत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी १८९५४ नवमतदार असुन ते पहिल्यांदाच आपल्या मताधिकाराचा हक्क बजावतील. ९७२ मतदान केंद्रावर जवळजवळ सात ते सव्वा सात हजार निवडणूक कर्मचारी कार्यरत राहतील. तर जवळपास चाळीस हजारांहून अधिक केंद्रीय, राज्य सुरक्षा दल आणि इतर पोलीसांची कुमक तैनात राहिल.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात ७२% मतदान झाले होते. यावेळी ते ७५% पर्यंत नेण्याचे आव्हान जिल्हा निवडणूक प्रशासनापुढे असल्याचे श्री दैनै यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील ९७२ मतदान केंद्रांपैकी १५ मतदान केंद्र हे अति – अति संवेदनशील, २०९ अति संवेदनशील तर संवेदनशील मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील दुर्गमता आणि नक्षली प्रभाव लक्षात घेता एकुण ३६६ मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रीय सुरक्षा दलाची एक कंपनी आणि स्थानिक पोलीस तथा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. सुरक्षा ही पोलीसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती राज्यांत यावेळी निवडणूक नसल्याने माओवाद्यांच्या निशाण्यावर गडचिरोली गोंदिया जिल्हा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूकीच्या काळात सी -६० या नक्षलविरोधी अभियान पथक हे सातत्याने अभियानावर असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे १७५ केंद्रीय आणि राज्य राखीव दलाच्या कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. त्यातील ११० कंपन्या मिळतील असा आशावाद निलोत्पल यांनी व्यक्त केला. यासोबतच ५ एम आय – १७ हेलिकॉप्टरमधून २१२ मतदान केंद्रावर २४८  ईव्हीएम आणि मतदान कर्मचारी पोहोचवणे आणि परत आणन्याचे कार्य केले जाणार आहे.एकुणच शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सांगितले.

नामनिर्देशन अर्ज सादर केल्यानंतरच खर्चाची नोंद घेतली जाईल 
उमेदवार हे नामनिर्देशन पत्र सादर करताना मोठमोठ्या मिरवणुका काढतात. यावेळी  मोठ्या प्रमाणावर वाहनं भरून लोक आणले जातात. अशा वाहनांचा खर्च उमेदवाराच्या खात्यात जोडला जातो काय?  या प्रश्नाचे उत्तर देताना जिल्हाधिकारी संजय दैने म्हणाले की नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याशिवाय तो उमेदवार म्हणून ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना येणारी वाहनं आणि माणसं ही आयोगाच्या कक्षेत येत नाही. मात्र आवेदनपत्र दाखल केल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे आणि सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारांच्या अतिरिक्त खर्चाची किंवा इतर कोणत्याही प्रकारची तक्रार सी – व्हिजिल एप वर कुणालाही ऑनलाईन करता येते. त्याची वेळीच दखल घेतली जाते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!