राजाने मारले आणि पावसाने झोडपले तरी न्याय कुणाला मागणार – आंदोलन कर्त्या नक्षलपिडीतांचा सवाल
खबऱ्यांच्या माहितीवर झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांवरच्या बक्षिसावर कोण मारतोय डल्ला?
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १ सप्टेंबर
जिल्ह्यातून नक्षलवाद नष्ट व्हावा यासाठी आम्ही जीवाची पर्वा न करता पोलीसांना व सरकारला मदत केली. आमच्या सुचनांवर जिल्ह्यात अनेक चकमकीतून नक्षली मारले गेले, पकडले गेले. यातून पोलीसांचा देशभर उदोउदो झाला. आणि आम्ही नक्षल पिडीत ठरलो. आमचे आयुष्य उजाड माळराना प्रमाणे झाले आहे. तर ज्या नक्षलवाद्यांनी आम्हाला उध्वस्त केले त्यांच्या आत्मसमर्पणानंतर सरकारने त्यांचेसाठी लाल गालिचे अंथरूण त्यांचे आयुष्य सुखकर केले. मात्र आजही आम्ही नक्षल पिडीत कुटुंब सरकारांच्या उपेक्षेचे बळी ठरलो आहोत. तिकडे नक्षल्यांची दहशत आणि इकडे सरकारदरबारी केवळ उत्पिडन, राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर जायचे तरी कुठे? की आम्हीही नक्षलवादी होउन नंतर आत्मसमर्पण करायचे म्हणजे आम्हाला सरकारी लाभ मिळतील? असा अत्यंत गंभीर प्रश्न नक्षल पिडीत कुटुंबीयानी उपस्थित केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनात बसले आहेत. मात्र अजूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही.
मागील २५ वर्षांपासून जिल्ह्यातील पाचशे हून अधिक नक्षलपिडीतांचे कुटुंबीय त्यांना पोलीसांकडून मिळालेल्या आश्वासनानुसार न्याय मागण्यांसाठी सरकार दरबारी खेटे घालत आहेत. परंतू त्यांना न्याय मिळत नाही. परिणामी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकाला असल्याचे नक्षल पिडीतांसाठी काम करणारे जन सेवा संघटनेचे अध्यक्ष विजय प्रकाश गुप्ता यांनी सांगितले .
गडचिरोलीत १९८० च्या सुमारास नक्षलवाद्यांचा वावर गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाला. आणि त्यानंतर २०१५ पर्यंत तो जिल्ह्यात कायम प्रभावशाली राहिला. नंतर २०२४ पर्यंत तो कमी कमी होत गेला. मात्र यासाठी प्रभावीपणे काम करणारे खबरी व त्यांचे कुटुंबीय नक्षल पिडीत ठरले आणि रस्त्यावर आले.
नक्षल्यांवर मात करण्यासाठी पोलीस आणि अन्य गुप्तचर विभागांनी जिल्हाभर खबरी नेमले आणि त्यांच्या माध्यमातून अचूक माहिती घेत चकमकीत नक्षली मारले. अनेक माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून आणले. कित्येक नक्षलवाद्यांची अटक करण्यात मदत केली. परिणामी त्यांचे कुटुंब नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आले. नक्षलवाद्यांनी १९९८ पासून आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो खबरींचे कुटुंब उध्वस्त केले, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केली. त्यांना त्यांचे राहते घर, गाव, वडिलोपार्जित शेती सोडून नक्षल पिडीत म्हणून वनवन भटकत उभे आयुष्य जगण्यासाठी अजूनही धडपड करावी लागते आहे.
शुक्रवारी आंदोलन स्थळी पत्रकारारांशी बोलताना अनेक पिडीतांनी सांगितले की खबरी म्हणून काम करत असताना त्यांच्या कुठेही नोंदी नाहीत, त्यांना ३ ते ६ हजारांपर्यंत मानधन दिले जाते. मात्र नक्षलवादी मारले गेले पकडले गेले किंवा अटक झाले तर त्यावरचे रिवार्डस् चे पैसे गायब होतात. खबऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याची हत्या झाल्यास किंवा गंभीर जखमी झाल्यास परिवारातील सदस्यांना पन्नास हजार ते दहा लाख रुपये अशा वेगवेगळ्या रकमा दिल्या जातात. पिडीतांना घरे नाहीत, हाताला काम नाही,
मृत्यूमुखी पडलेल्या खबरींच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी नाही , कित्येकांना नक्षल पिडीत प्रमाणात मिळण्यास विलंब होतो. अशावेळी शासन प्रशासनाकडून सहानुभूती पुर्वक आमच्या साध्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे आम्ही हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नक्षल पिडीत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बापू बोरकुट यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व तथा मार्गदर्शन जन सेवा संघटनेचे अध्यक्ष तथा पोलीस पिडीत विजय प्रकाश गुप्ता हे करीत असुन त्यांनी नक्षल पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली पर्यंत पैदल मार्च काढण्याचा निर्धार केला आहे.