अशोक नेते यांचे जात प्रमाणपत्र बोगस विजय वडेट्टीवार यांचा आरोप
वडेट्टीवारांच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे आकसापोटी आरोप
वडेट्टीवार : आम्ही न्यायालयात दाद मागणार
नेते : ती निश्चितच मागा,सत्य समोर येईल
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १३ एप्रिल
कांग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार अशोक नेते यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा केला आहे. गडचिरोली जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेच्या बैठकीत मंचावरुन बोलताना त्यांनी आपण हे पुराव्यानिशी सिद्ध करणार असुन त्यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.
या आरोपावर उत्तर देताना खा. अशोक नेते म्हणाले की गडचिरोली – चिमूर लोकसभेत वडेट्टीवार आणि कांग्रेसचे उमेदवार यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचा पराभव निश्चित असल्याने त्यांनी सामान्य लोकांचे हकनाहक लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांनी खुशाल न्यायालयात जावे. तिथे सत्य काय आहे ते समोर येईल.
वडेट्टीवार यांनी नेतेंच्या जात प्रमाणपत्र बोगस असल्याच्या पुराव्यांचे काही कागदपत्र सभेत दाखवले. ते म्हणाले की अशोक नेते यांचे जात प्रमाणपत्र हे नागपूर येथून तयार केले आहे. त्यात दाखला म्हणून दहावीची टीसी जोडली आहे. सावनेर तालुक्यातील ज्या गावात त्यांचा जन्म झाला. त्या ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या जन्मदाखल्याची नोंदच नाही. तर त्यांचे चुलत भाऊ त्यांची जात वेगळीच आहे.
खा. अशोक नेते यांनी सांगितले की त्यांचे सख्खे भाऊ हे अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून आरटीओ म्हणून नोकरी करीत होते. तर स्वतः नेते गडचिरोलीत मागिल ३५ पेक्षा अधिक वर्षांपासून राजकारणात आहेत. ते दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून कार्यरत आहेत. या काळात वडेट्टीवारांना हे दिसले नाही काय? एवढी वर्ष त्यांनी याचा शोध कां घेतला नाही? आताच त्यांना हे कसं सुचलं? आपला उमेदवार पडण्याच्या भीतीपोटी बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा धंदाच आहे.
वडेट्टीवार आणि नेते यांच्यात जातप्रमाणपत्राच्या विषयावरुन रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे लोकसभेच्या प्रचारात गर्मी वाढली आहे.