उद्यापासून गडचिरोलीत पाच दिवस महा संस्कृती महोत्सव
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १५ फेब्रुवारी
महा संस्कृती महोत्सव अंतर्गत गडचिरोलीतील रसिकांसाठी पाच दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी याचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्यावतीने महा संस्कृती महोत्सवाचे आयोजन १६ ते २० फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या
पटांगणात करण्यात आले आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा पाटील यांनी घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी, कुरखेडा, विवेक सांळुके तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थितीमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, खासदार अशोक नेते, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आमदार सुधाकर अडबाले, डॉ. रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे यांची सोयीनुसार उपस्थिती राहणार आहे.
महासंस्कृती महोत्सवात शुक्रवार १६ रोजी नक्षत्रांचे देणे हा सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, सारेगमप विनर प्लेबॅक सिंगर ऋषिकेश रानडे व फिल्मफेयर अवार्ड विजेत्या गायिका आनंदी जोशी सादर करणार आहेत. १७ ला जागर लोककलेचा, दंडार, गोंधळ, रेला नृत्याचे सादरीकरण झाडीपट्टी ग्रुपचे हरीशचंद्र बोरकर आणि मेघा घाडगे व सहकलाकार लावणी सादर करणार आहेत. १८ रोजी बिरसा मुंडा यांची जीवनगाथा
या महानाट्याचे सादरीकरण होईल. १९ ला समीर चौगुले आणि सहकाऱ्यांकडून हास्य जत्रा कार्यक्रमाचे तर मंगळवार २० फेब्रुवारी रोजी कूवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित झाडीपट्टी महानाटकाचे सादरीकरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले आहे.