आपला जिल्हाक्राईम स्टोरी

बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणारे आणखी आठ आरोपी गजाआड

आरोपींची संख्या १४; आणखी वाढ होण्याची शक्यता

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १ मे

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या आधारे पोलीसांत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील एका वकिलासह आठ आरोपींना गडचिरोली पोलीसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या १४ झाली आहे. गुन्हे दाखल झालेल्या आरोपींमध्ये सिद्धेश पाटील रायगड, हौसाजी देशमुख, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची, जिल्हा सांगली, सत्तार शेख व पांडुरंग धलपे बीड, धनराज राजेंद्र रेचनकर, वय २७ वर्ष, रा. मुडझा, राकेश अनिल कावळे, वय२५ वर्षे, रा. कनेरी, लक्ष्मीकांत अनिल कावळे, रंजित श्रिनिवास कोठारी, वय २२ वर्षे, रा. रंगधामपेठा, ता. सिरोंचा यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय आहे की गडचिरोली जिल्हा पोलीस भरती मध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन काही युवकांनी नोकरी मिळवली असल्याच्या एका निनावी पत्रावरुन गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसु यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली. यात आठ दिवसांतच पाच जणांना अटक करण्यात एलसीबीने यश मिळविले.

त्या ५ आरोपींनी बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता आरोपी देविदास ऊर्फ बाळू देवराव मेश्राम याचे मार्फतीने मोठी रक्कम दिली असल्याचे तपासात निष्पन्न होताच पोलीस पथकांनी वनविभागात कार्यरत असलेल्या देविदास देवराव मेश्राम यांस अमरावती येथून ताब्यात घेवून अटक केली. पोलीस कोठडी रिमांडदरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहीतीवरून देविदास मेश्राम याचे मार्फतीने रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला सिद्धेश पाटील यांस खोटे प्रमाणपत्र मिळविण्याकरीता मोठी रक्कम पाठविली असल्याचे तपासात दिसून आले. आरोपींकडून मिळालेल्या माहीतीवरून पोलीस पथकाने रायगडवरुन सिद्धेश पाटील यांस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने ती रक्कम पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, जिल्हा सांगली येथे फार्मसिस्ट या पदावर कार्यरत असणारा हौसाजी देशमुख यांस पैसे पाठवून खोटे प्रमाणपत्र मिळविले असल्याची माहीती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हौसाजी देशमुख यास म्हसवड, जि. सातारा येथून ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने खोटे प्रमाणपत्र तयार करण्याकरीता बीड येथील सत्तार शेख व पांडुरंग धलपे हे पैसे घेवून मदत करीत असल्याचे सांगीतले. त्यानंतर गडचिरोली येथील एलसीबीच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने सत्तार शेख व पांडुरंग धलपे यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पांडुरंग धलपे हे पेशाने वकिल असून सत्तार शेख हे शासकिय कार्यालयांमध्ये नौकरीवर नसतांनादेखिल विविध कार्यालयांच्या संपर्कात राहुन माहीती मिळवित होता व त्या माहीतीच्या आधारे सर्व आरोपी संगणमत करून लोकांकडून मोठ्या रकमा स्विकारून खोटे प्रमाणपत्र तयार करून देत होते. आरोपींना पोलीस पथकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सापळा रचून ताब्यात घेवून त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रकरणाच्या तपासाची गती व व्याप्ती बघून आरोपींचा ०५ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेला आहे. आतापर्यंत एकुण १४ आरोपींना अटक करण्यात आली असून भविष्यात ही संख्या अजून वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!