आपला जिल्हाताज्या घडामोडी

पोलिसांनी बळाचा वापर करून तोडगट्टा येथील खाणविरोधी जनआंदोलन दडपले! ८ नेते पोलीसांच्या ताब्यात

आंदोलन स्थळ उध्वस्त करून आंदोलनकर्त्यांना हाकलून लावले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० नोव्हेंबर 

दमकोंडावाही बचाव संघर्ष समितीच्या सामुहिक नेतृत्वात तोडगट्टा येथे मागील २५० दिवसांपासून सुरू असलेले खाण विरोधी जनआंदोलन सोमवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या संख्येने आलेल्या पोलीसांनी बळाचा वापर करून चिरडून टाकले आणि काही प्रमुख आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

एटापल्ली तालुक्यातील ७० आदिवासी ग्रामसभांनी सुरजागड परिसरात सुरू केल्या जाणाऱ्या ६ नव्या लोहखाणी विरोधात तोडगट्टा येथे जनआंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन शांतीपूर्ण सुरू होते. आज सोमवारी पहाटेच्या सुमारास विविध पोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रातील महिला व पुरुष पोलीसांचे जथ्थे आंदोलन स्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनातील ऊपस्थित प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाचा मंडप,भोजन व्यवस्थेचे स्थळ उपटून मोडून काढले आणि आंदोलनकर्त्या आदिवासींना तेथून हुसकावून लावले. पोलिसांनी
प्रदीप हेडो, मंगेश नरोटी, साई कवडो, मधू कवडो, निकेश नरोटी आणि गणेश कोरिया यांचे सह आणखी काही जणांना ताब्यात घेऊन हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले आहे. अशी माहिती दमकोंडावाही बचाव संघर्ष समितीचे प्रमुख नेते ॲड. लालसु नागोटी यांनी दिली आहे. मागील दोन दिवसांपासून पोलीस ड्रोनच्या माध्यमातून या परिसराची पाहणी करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनातील प्रमुख नेते ॲड. लालसु नागोटी, सुशिला नरोटी, राकेश आलाम, पुनम जेट्टी, वंदू हुलके, आणि सैनु हिचामी हे एका कार्यक्रमानिमित्त दिल्ली येथे गेले असल्याची संधी साधून पोलीसांनी बळाचा वापर करून आंदोलन उध्वस्त केले. असा आरोप नागोटी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.

आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन केंद्र ते राज्य सरकार मधील सर्व संबंधितांना पाठविले असताना मागील २५० दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट दिली नाही. याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

पोलिसांनी बळाचा वापर केला नाही ; ग्रामस्थांनी स्वत:हून आंदोलन संपवले.

गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील वांगेतुरी पोलीस स्टेशन आज उघडण्याचा प्रस्ताव होता. याकरिता गट्टा पोलिस दल सी ६० पथकासह तोडगट्टा मार्गे वांगेतुरीकडे जात असताना तोडगट्टा येथील आंदोलकांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले व सुमारे १० ते १५ जणांनी पोलिस दलातील जवानांना धक्काबुक्की केली, त्यापैकी ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे करत असताना पोलिसांनी बळाचा वापर केलेला नाही. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
काही स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार केली की त्यांना माओवादी आणि माओवादी आघाडीच्या संघटनेकडून निषेधासाठी बसण्यास भाग पाडले जात आहे आणि त्यांना या भागात रस्ता आणि मोबाइल टॉवर हवे आहेत त्यानंतर गावकऱ्यांना पोलिसांकडून संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी स्वत:हून आंदोलन संपवले.

नीलोत्पल बसू, जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली

 

 

तोडगट्टा आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले

तोडगट्टा आंदोलनाला शासनाने पोलीस बळाचा वापर करून आज चिरडून टाकल्याचे माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार आणि सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख सैनू गोटा आंदोलनस्थळी ठाण मांडून असलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी निघाले असता गट्टा – जांभीया पोलीस मदत केंद्राजवळ त्यांना संवेदनशीलतेचे कारण देवून अडविण्यात आले.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार खदान कंपन्यांच्या इशाऱ्यावरुन पोलीस बळाचा वापर करून जनतेची मुस्कटदाबी करीत आहे,  तोडगट्टाचे खदान विरोधी आंदोलन दडपशाहीने संपणार नसून संपूर्ण जिल्हाभरातील मंजूर आणि प्रस्तावित लोह खदानींच्या विरोधातील आंदोलन संवैधानिक पध्दतीने सुरुच राहणार असल्याचा इशारा भाई रामदास जराते, काॅ. अमोल मारकवार, सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, माजी पंचायत समिती सदस्य शिलाताई गोटा यांनी दिला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!