आपला जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात पाणीच पाणी

९९४ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १४ जुलै

मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जबर फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इरई धरणाचे सात दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने रहमतनगर, राजनगर येथे शेकडो घरात पुराचे पाणी शिरले आहे. यांसह बल्लारपूर तालुक्यातील चारगाव, हडस्ती, राजुरा तालुक्यातील कोलगाव तसेच सास्ती या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ९९४ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता वाढली असून जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, अंधारी, इरई, झरपट या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महानगरपालिकेचे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्ट पाण्याखाली आले आहेत. वर्धा नदीच्या पुलावर पाणी आल्याने राजुरा वरून चंद्रपूर जाणारा राज्य मार्ग बंद झाला आहे. कोलगाव हे गाव वर्धा नदीच्या पुरामुळे पाण्याने वेढले गेले आहे. चौदा घरांची पझडड झाली आहे. तर मुल तालुक्यातील ३ घरांची पूर्णतः व ५८८ घरांची अंशतः पडझड झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा पुलावरून पाणी वाहत असल्याने महाराष्ट्र-तेलंगाना राज्यमार्ग बंद झाला आहे. राजुरा-आसिफाबाद रस्ता बंद आहे. चुनाळा – विरुर, टेंबुरवाही ते विरुर हा मार्ग मोठ्या नाल्यांच्या प्रवाहामुळे बंद झाला आहे. बल्लारपूर तालुक्यात नदी नाल्यांना पूर असल्याने चारगाव-हडस्ती, कोठारी-कवडजई,बल्लारपूर-राजुरा, कोठारी-तोहगाव, लावारी-देहरी, माना-चारवट असे सहा मार्ग बंद आहेत. भद्रावती व माजरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्याने माजरी रस्ता दुसऱ्या दिवशी बंद आहे. तसेच इतर छोटे मार्ग बंद आहेत.

अपर वर्धा, गोसीखुर्द, इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा, वैनगंगा, इरई तसेच झरपट या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी नदीपट्टयातील शेकडो घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना घर सोडावे लागले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे या सर्वांनी विविध ठिकाणी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला व तात्काळ अत्यावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

मुलाच्या उपचारासाठी वडिलांनी पुरातून काढला मार्ग

चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वर्धा वैनगंगा नदीला पूर आला. मुलगा तापाने फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. नदी, नाल्यांना पुर मात्र बाप तो बापच. मुलाला खाद्यावर घेत बापाने पुरातून पायी मार्ग काढीत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील श्यामराव पत्रूजी गिनघरे असे या जिगरबाज बापाचे नाव आहे.
गावातील श्यामराव पनूजी गिनघरे यांच्या मुलगा कार्तिक याला ताप आला. तापाने तो फणफणत होता. गावात आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे पोडसा गावापासून पाच ते सहा कि.मी. अंतरावर वेडगाव गाव आहे. येथे खाजगी डॉक्टर आहेत. मुलाला खांद्यावर वर घेऊन भर पुरातून श्यामराव मार्ग काढीत गेला. मुलावर उपचार केला अन परत पुरातून मार्ग काढीत गावाकडे गेला.

 

महावीर इंटरनॅशनल संस्थेने केली पूरग्रस्तांची मदत

जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून मनपा आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे ९०० पेक्षा अधिक लोकांना मनपाच्या शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. आपदग्रस्तांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या महावीर इंटरनॅशनल संस्थेने चंद्रपूर येथील पूरग्रस्तांची भोजनाची व्यवस्था करून पुन्हा एकदा आपल्या सेवाभावी वृत्तीचा परिचय दिला आहे. सुरुवातीला मनपाने ६०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती महावीर इंटरनॅशनल संस्थेस केली होती. मात्र दिवसभरात विस्थापितांची संख्या जवळपास ९०० च्या घरात गेली मात्र संस्थेने विस्थापितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आधीच लक्षात घेऊन ह्या सर्व नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!