
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ ऑगस्ट
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगडमधील जंगली हत्तींनी जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता ४० ते ५० हत्तींचा एक कळप जिल्हा सीमेपासून अवघ्या १५ किमी अंतरावरील छत्तीसगडच्या मानपूर परिसरात आढळून आला आहे. जिल्ह्यातील वनविभागाची यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.
मागील वर्षी २० ते २२च्या संख्येत असलेल्या जंगली हत्तीच्या कळपाने गॅरापती, कोटगूल मार्गे धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील विस्तीर्ण जंगलात प्रवेश केला होता. व एक ते दीड महिना मुरुमगाव वनपरिक्षेत्रात मुक्काम ठोकला. यादरम्यान शेकडो हेक्टरवरील धान पिकाचे नुकसान केले. अनेक गावात प्रवेश करुन अनेकांची घरे जमीनदोस्त केली. तसेच घरातील अन्नधान्यांची नासाडी केली होती. जंगली हत्तींचा कळप गावात प्रवेश करू नये यासाठी मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील नागरिक रात्र जागून काढत होते. दीड महिन्यानंतर हत्तीचा कळप छत्तीसगड परत गेल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र ८ महिन्यानंतर जवळपास ४० ते ५० हत्ती असलेला कळप जिल्हा सीमेवरील छत्तीसगडच्या मानपूर परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये पुन्हा धडकी भरली आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे जंगली हत्ती पुन्हा जिल्ह्यात दाखल झाल्यास वनविभागा समोर अनेक समस्या निर्माण होणार आहेत.
पीडित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत
गतवर्षी आलेल्या रानटी हत्तींनी मुरुमगाव वनपरिक्षेत्रातील फुलकोडो, दराची, भोजगाटा. पोटावीटोला (इरूपघोडरी) व मुजालगोंदी आदी गावातील अनेकांची घरे जमीनदोस्त केली. यादरम्यान घरातील अन्नधान्याची प्रचंड नासाडी केली. वनविभागाने नुकसानीचे पंचनामे तर केले मात्र तब्बल एक वर्षांचा कालावधी लोटण्याच्या मार्गावर असताना सुद्धा एकाही पीडिताला अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. यामुळे हत्ती पीडितांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.