आपला जिल्हाविशेष वृतान्त

गोंडवाना विद्यापीठात भरणार नॅकचा पोळा! ऐन पोळा आणि तान्हा पोळ्याच्या दिवशी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची ( नॅक ) चमू देणार भेट

नजरचुकीने की हेतूपुरस्सर तारीख दिली?

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ सप्टेंबर 

” आज आवतन  घ्या, अन उद्या  जेवायला या” असं आमंत्रण पोळ्याच्या पहिल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना देतो. ऐन आवतनाच्या दिवशी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पोळ्याच्या आदल्या दिवशी  राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या  समितीला निमंत्रित केले आहे. आणि त्यांनीही होकार कळवला आहे . त्यामुळे ही समिती नेमकी तज्ञांची की शेतकऱ्यांच्या सर्जा राजाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गोंडवाना विद्यापीठात बुधवार १३ ते शुक्रवार १५ सप्टेंबर असे तीन दिवस राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची चमू भेट देणार आहे. ही चमू गोंडवाना विद्यापीठातील सर्व विभागांसह मॉडेल कॉलेजला भेट देऊन पाहणी करणार आहे. ऐन पोळ्याच्या सणाचे तीन दिवस नॅक गोंडवाना विद्यापीठाचे मुल्यांकन करणार असल्यामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऊल्लेखनीय आहे की नॅक मूल्यांकनासाठी संबंधित विद्यापीठ अथवा महाविद्यालयांकडून समितीला तारखा कळवायच्या असतात. दिनदर्शिकेत जानेवारी महिन्यात सर्व सण, उत्सव, सुट्या या सर्वांची माहिती दिली असते. विद्यापीठाने चार महिन्यांपूर्वी ही तारीख दिली. त्यावेळी त्यांना हा सणासुदीचा काळ आणि सुट्या लक्षात आल्या नाहीत की “हाच काळ आपल्या विद्यापीठाच्या मुल्यांकनासाठी अतिशय योग्य आहे. असा विचार कुलगुरूंनी करून ही तारीख दिली?” हा प्रश्न विद्यापीठाशी संबंधितांना पडला आहे.

नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक निकषांच्या संदर्भात कुलगुरू डॉ. प्रंशात बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच विद्यापीठातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठ स्थापने पासून प्रथमच विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन होत आहे. त्यासाठी विद्यापीठाची रंगरंगोटी करून सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे.

नॅक मूल्यांकन अत्यंत महत्त्वाचे
सध्या सर्वच शिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेची(नॅक ) मान्यताप्राप्त असणे अत्यंत आवश्यक आहे. जर कुठल्याही उच्च शिक्षण संस्थांना नॅक ची मान्यता नसेल तर ती संस्था शासनाच्या अनेक योजना पासून वंचित राहते. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना आणि संबंधित महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे बंधनकारक केले आहे.

ढिसाळ नियोजनामुळे जर विद्यापीठाच्या ग्रेडेशनवर विपरीत परिणाम झाला, तर यासाठी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील

सुट्यांमुळे विद्यार्थी उपस्थित न राहिल्यास मुल्यांकनामध्ये दर्जा घसरण्याची शक्यता असते. सुट्यांमध्ये समिती आल्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याच त्रास होतो. कुलगुरूंच्या ढिसाळ नियोजनामुळे जर विद्यापीठाच्या ग्रेडेशनवर विपरीत परिणाम झाला, तर यासाठी कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील .

प्रा. डॉ. दिलीप चौधरी, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

नॅक मान्यतेचा उद्देश

नॅक ची स्थापना विद्यापीठांमधील पायाभूत सुविधा, सूचना, संशोधन आणि शिक्षण मानकांचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आली. ज्या प्रमाणित संस्था सर्व आवश्यकता पूर्ण करतात. त्या सर्वोच्च ग्रेड (A++, A+, A) मिळवतात. नॅक ने विद्यापीठांच्या दर्जासाठी जे निकष निश्चित केले आहेत ते नॅक मान्यतेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत की नाही हे निर्धारित करण्यासाठी हे निकष तपासू शकतात. याव्यतिरिक्त, फेडरल आणि राज्य सरकारांद्वारे चालवल्या जाणार्‍या निधी कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्रमाणपत्राद्वारे प्रदान केला जातो.

विद्यापीठाकडूनच दिली गेली तारीख, बदलून देण्याची विनंती केली, परंतु नॅकने नाकारली
नॅकला सुरूवातीला विद्यापीठाकडून १३ ते १५ सप्टेंबर ही तारीख दिली होती. ती त्यांनी स्वीकारली. मात्र काही कालावधीनंतर या काळात पोळा हा सण असल्याचे लक्षात आले. तेव्हा ही तारीख बदलून देण्याची विनंती नॅक समितीला केली. परंतु त्यांनी तारीख बदलून देण्यास नकार दिला. म्हणून सणासुदीच्या काळात मुल्यांकन केले जात आहे. मागील १२ वर्षांपासून विद्यापीठाला नॅकचे मानांकन नाही. त्यामुळे जी तारीख ठरली त्याच वेळी मुल्यांकन केले जाणार आहे.
डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!