भाजपच्या विद्यमान खासदाराची जागा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे
अंतिम निर्णय पक्षाच्या निवडणूक कमिटीचा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २३ ऑगस्ट
भाजपच्या खासदाराची विद्यमान विनिंग सीट महायुतीमधील इतरांसाठी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. महाराष्ट्रात भाजप सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरीचे आमदार धर्मराव आत्राम यांनी स्वतःला महायुतीचे उमेदवार म्हणून स्वतःच घोषित केले. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान पदी आरुढ करण्याचे ठरविले असून त्यासाठी भाजपने महायुतीसाठी ४५ लोकसभा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे . यासाठी आतापासून महा जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या निमित्ताने बावनकुळे बुधवारी गडचिरोली येथे आले होते. त्यांनी सकाळी शहरातील बाजारपेठेतील काही ठिकाणी जनसंवाद कार्यक्रम केला. त्यानंतर भाजपच्या गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील ३०० बुथ पालकांशी वैयक्तिक संवाद साधला. एका बुथ पालकाकडे तीन बुथची जबाबदारी दिली असुन त्यांचेकडून दररोज पक्षासाठी ३ तास वेळ देण्याचा संकल्प सोडून घेतला.
तदनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र भाजपच्या महाविजय अभियानाची माहिती देताना सांगितले की भाजप लोकांकडून निवडणुकीत मतांच जे कर्ज घेते ते विकासाच्या माध्यमातून व्याजासह परत करण्याचा प्रयत्न करतो . त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेसमोर जाऊन मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकास कामे सांगावी. शेतकऱ्यांची वीज माफी, कर्जमाफी आणि महागाईच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की आत्मनिर्भर भारत हाच त्यावरचा उपाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यादृष्टीने मोठी पावलं उचलली असून आगामी काळात या समस्यांवर तोडगा निघेल. भाजपने लोकसभा विजयासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १०० या प्रमाणे एका लोकसभा क्षेत्रात ६०० प्रवासी कार्यकर्ते निवडले असुन ते लोकसभा ते विधानसभा या काळात पूर्णवेळ काम करणार आहेत. भाजपचा महाविजय निश्चित आहे. फक्त लोकांना भेटण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खा. अशोक नेते,जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी राज्यमंत्री अम्बरीशराव आत्राम, संघटन महासचिव रविंद्र ओल्लालवार यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यानिमित्ताने खासदार अशोक नेते यांच्या वॉर रूमचे आणि शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या नव्या ब्रांच चे उद्घाटन करण्यात आले.
कांदा प्रश्नी विरोधकांकडून दिशाभूल
शेकऱ्यांकडे ४० लक्ष टन कांदा शिल्लक असताना सरकार फक्त २ लक्ष कांदा खरेदी करीत आहे. उर्वरित कांदा कवडीमोल भावाने विकायचा की फेकून द्यायचा. असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की हा खरेदीचा पहीला टप्पा आहे. सरकारची भूमिका समजून न घेताच विरोधकांनी आरोप करणे सुरू केले आहे. सरकार टप्प्याटप्प्याने कांदा खरेदी करणार असून कोणत्याही कांदा उत्पादकाला निराश करणार नाही.