मुलचेरा तालुक्यातील बंधारे मुळ जागा सोडून काढताहेत पळ
मंजूर जागा सोडून भलतीकडेच सुरू आहे बांधकाम. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना दाखवला जातोय ठेंगा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १३ जानेवारी
मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम अंतर्गत येणाऱ्या कांचनपूर गावातील तलावाच्या खालच्या बाजूला मंजूर झालेल्या आणि मृदा व जलसंधारण विभागाचे माध्यमातून निर्माण करण्यात येत असलेला बंधारा आपले मुळ ठिकाण सोडून तीन किलोमीटर अंतरावर पूढे पळवण्यात आल्याने या परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याशिवाय आणखी काही ठिकाणी असेच प्रकार सुरू असल्याने सदर बंधारे बांधकामांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष निर्माण कार्य स्थळाला भेट देऊन स्थानिकांकडून माहिती घेतली असता हे गौडबंगाल समोर आले आहे. मृदा व जलसंधारण विभागाचे वतीने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला अडचणीच्या प्रसंगी किमान एक पाणी मिळावे यासाठीची व्यवस्था करण्यासाठी अशा मध्यम प्रकारचे बंधारे मोठ्या प्रमाणावर बांधले जात आहेत. हे बंधारे बांधताना मात्र प्रत्यक्षात नियोजित जागा, मंजूरी मिळाली ते ठिकाण सोडून काही राजकीय कार्यकर्त्यांच्या लाभासाठी त्यांच्या दबावाखाली दुसरीकडे कुठे एक ते तीन किमी अंतरावर अवैधरित्या बांधण्याचा पराक्रम मृदा व जलसंधारण विभागाचे अभियंता करताना आढळून आले आहेत.
शांतीग्राम ग्रामपंचायत अंतर्गत कांचनपूर येथील बंधारा हा लगाम डॅमच्या वेस्टवेअरमुळे तयार झालेल्या नाल्यावर मंजूर ठिकाणापासून तीन किमी अंतरावर अवैध पध्दतीने बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे या साठवणूक केलेल्या पाण्याचा लाभ मंजूर क्षेत्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार नाही. उल्लेखनीय असे की ज्या ठिकाणी सदर बंधारा मंजूर करुन त्याचा इस्टीमेट तयार करण्यात आला त्या ठिकाणी साधारणतः साठ लक्ष रुपये किंमतीच्या बंधाऱ्याचा प्रस्तावच होऊ शकत नाही असे प्राथमिक पाहणीतून दिसून येते. मृदा व जलसंधारण उपविभाग अहेरी कार्यालयामार्फत २०२२-२३ या वर्षात मंजूर सिंचन विकासाच्या इतरही कामात अशाच प्रकारे गौडबंगाल करून बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली ते श्रीनगर रोडवर बांधला जात आहे. परंतू याची मंजूरी दुसरीकडे आहे. सदर बांधकाम सुरू असलेली जागा वनविभागाच्या कक्षात येत असुन बांधकामासाठी वनविभागाची परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर गोमनी येथील सुस्थितीत असलेला बंधारा विनाकारण तोडून कोल्हापूरी पध्दतीने तयार करण्यात येत आहे. याची किंमत एंशी लक्ष रुपयांच्या आसपास आहे. या सर्व गौडबंगाल मध्ये विभागातील अधिकारी लिप्त असुन त्यांच्या छत्रछायेखाली हे सुरू असल्याने या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामांची वरिष्ठ स्तरावरून योग्य चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात आम्ही मृदा व जलसंधारण उपविभागीय अभियंता प्रफुल्ल पुल्लावार यांचेशी भ्रमणध्वनी वरुन आणि प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही आणि कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांची बाजू इथे मांडता आली नाही. ते किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होताच प्रशासनाचीही बाजू मांडली जाईल.