
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१५ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातही शहरासह ग्रामीण भागात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांच्या सुरक्षेसाठी अहेरी येथे आज शनिवार १५ जुलै रोजी ‘निर्भया’ पथकाची स्थापना करण्यात आली असून हे पथक स्थापना होताच जागरण रॅली काढून कार्यरत झाले आहे. रॅलीतून निर्भया पथक महिला सुरक्षा करण्यासाठी काय करणार आणि संकटात सापडलेल्या महिला, युवतींनी काय करावे असा संदेश दिला.
पोलीस अधीक्षक निलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्राणहिता) यतीश देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक आरती नरोटे यांनी अहेरी येथील दानशूर चौकात ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली.
सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी छेडछाड, विटंबना, विनयभंग यासारखे प्रकार रोखण्यासाठी अहेरी पोलीस दलातील ‘निर्भया’ पथक काम करणार आहे. अहेरी हे दक्षिण गडचिरोलीतील महत्वाचे ठिकाण असून सुरजागड लोहदगडाच्या खाणीमुळे वाढती वाहतूक, व बाहेरून आलेले लोक यामुळे या भागातील महिला असुरक्षित झाली असल्याचे दिसून येते. या खाण क्षेत्रात महिलांच्या शोषणाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. आलापल्ली, नागेपल्ली आणि अहेरी येथे शाळा, महाविद्यालय असल्याने तसेच उपजिल्हा मुख्यालय असल्याने विविध कामासाठी शाळकरी मुली व महिलांचा दररोज ये जा असते. अश्यावेळी त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता निर्भया पथक घेणार आहे.
या पथकात महिला पोलीस अधिकारी आरती नरोटे, करिष्मा मोरे आणि महिला पोलीस अंमलदार काम करणार आहेत. स्थापना होताच या पथकामार्फत अहेरी आणि आलापल्ली सारख्या महत्वाच्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालून कामाला सुरुवात केली आहे. आता महिलांची छेडछाड करणे, पाठलाग करणे, गैरवर्तन करणे, अश्लील हावभाव करत महिलांना त्रास देणे अशा प्रकारच्या घटनांवर या पथकाची करडी नजर राहणार आहे. विशेष म्हणजे शिकणारे मुली, महिला कर्मचाऱ्यांना अश्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या पथकाकडून शाळा,महाविद्यालयात जाऊन मुलींमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करून निर्भया पथकाचे कामकाज समाजविण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांचा हेल्पलाईन नंबर तसेच अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकाबाबत माहिती दिली जात आहे.
संकटाला घाबरु नका ; निर्भया पथक २४ तास आपल्या सेवेत
महिला आणि मुलींवर कुठलेही संकट आल्यास त्यांनी न घाबरता 112 या हेल्पलाईन नंबर वर अथवा दिलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनी नंबर वर कॉल करावे. निर्भया पथक 24 तास आपल्या सेवेत हजर राहणार.
आरती नरोटे,निर्भया पथक अधिकारी, अहेरी