संपादकीय

नव्या राजकीय समीकरणानंतरही गडचिरोली -चिमुर लोकसभेच्या आखाड्यात खासदार अशोक नेतेंचेच पारडे जड

राजकारण/ सत्ताकारण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ६ जुलै 

वृत्तविष्लेषन  | हेमंत डोर्लीकर

 

२०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आढावा घेणे सुरू केले असून नवनव्या घडामोडी घडत आहेत. भाजपणे ३० मे ते ३० जून पर्यंत संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या कामाची माहिती जनते पर्यंत पोहोचविण्या साठी महा जनसंपर्क अभियानातून विविध सम्मेलन घेतानाच ऊमेदवारांची चाचपणी करणेही सुरू केले आहे. तर कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे, आप आणि नव्याने महाराष्ट्रात दाखल झालेली भारत राष्ट्र समिती या सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा आपापल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. नुकतीच यात भर पडली ती राष्ट्रवादीत फुट पडून अजित पवारांचा गट महायुतीत सामिल झाल्याची. या घडामोडीत अहेरीचे आमदार आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या धर्मराव आत्राम यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्याची. मंत्री पदामुळे आत्राम यांना संपूर्ण लोकसभा क्षेत्र काबिज करता येईल आणि ते पुढे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या तिकिटाला सुरुंग लावू शकतील किंवा वेगळे लढून नेतेंना तगडे आव्हान देतील. त्यामुळे नवी घडामोड विद्यमान खासदारांसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरेल असे कयास बांधले जात आहेत. किंवा प्रसारमध्यमांत बातम्यांचे नळकांडे सोडून वातावरण निर्मीतीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले तरी विद्यमान परिस्थितीत अशोक नेते यांची कुठल्याही प्रकारची डोकेदुखी वाढली नसून त्यांचेपूढे कुणाचेही आव्हान नसल्याचे दिसते. नव्या राजकीय समीकरणानंतरही गडचिरोली – चिमुर लोकसभेच्या आखाड्यात खासदार अशोक नेतेंचेच पारडे जड असल्याचे दिसून येत आहे 

गडचिरोली – चिमुर लोकसभेचे विद्यमान खासदार अशोक नेते हे विद्यमान असल्याने लोकसभेचे पहिले दावेदार आहेत. तर भाजपचे गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी हे भाजपकडून दुसरे दावेदार आहेत. त्यांनी २०१४ मध्ये ही दावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी चे आमदार धर्मराव आत्राम यांनी, वडसा देसाईगंज येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी दिलेल्या आश्वासनालाच पक्षादेश मानून चिमूर येथून लोकसभेचा बिगूल फुंकला. परंतु ताज्या घडामोडी नुसार ते आता भाजपचे राष्ट्रवादी मित्र झाले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी २०२४ ची लोकसभा येनकेन प्रकारे लढविण्याचा संकल्प सोडला आहे. असे असले तरी विद्यमान आणि आगामी १० महिन्यानंतरच्या स्थितीत सुद्धा धर्मराव आत्राम अशोक नेतेंची तिकीट कापून उमेदवार होऊ शकतील अशी मुळीच स्थिती नाही.

कांग्रेस व ठाकरे शिवसेनेची खेळी अद्याप समोर आलेली नसली तरी ठाकरे शिवसेनेची गडचिरोली – चिमूर लोकसभा लढण्याची पात्रता आणि इच्छा दोन्ही नाहीत. कांग्रेसचा उमेदवार अंतिमतः पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ठरतो असा अनुभव आहे. असे असले तरी कांग्रेसचे गडचिरोली जिल्ह्यातील नेते तथा मागिल लोकसभेचे पराभूत उमेदवार डॉ नामदेव उसेंडी, सध्या सक्रिय असलेले डॉ. नामदेव किरसान, हे प्रमुख उमेदवार शर्यतीत आहेत. आम आदमी पार्टी यावेळी महाराष्ट्रात काहीशा ताकदीने उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर महाराष्ट्रात त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत भारत राष्ट्र समिती दिसून येत आहे. अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्हा भर संघटन विस्तारावर भर दिला जात असून योग्य उमेदवाराचा शोध घेण्याचे काम जारी आहे.

या विद्यमान स्थितीत गडचिरोली- चिमुर लोकसभेत भाजप, महाविकास आघाडी, आप आणि भारत राष्ट्र समिती अशा चार प्रमुख उमेदवारांसह एखादा बंडखोर असे किमान पाच सक्षम उमेदवार मैदानात राहतील असा कयास बांधला जात आहे. त्रिकोणी वा चौकोनीय लढतींचा फायदा भाजपला होतो हे अनेकदा सिद्ध झाले आहे. खासदार अशोक नेतेंना तिकीट मिळण्यात अडचण दिसून येत नाही. याचा फायदा त्यांना होईल.

मागिल लोकसभेत अशोक नेते यांनी ५ लाख १९ हजार ९६८ मते घेतली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांनी ४ लाख ४२हजार ४४२ मते घेतली. वंचित बहूजन आघाडीचे डॉ. गजभे हे तिसऱ्य १ लाख ११ हजार ४६८ मते मिळवत तिसऱ्या स्थानावर राहिले. यात अशोक नेते यांचा ७७ हजार ५२६ मतांनी विजय झाला. २०१४ च्या निवडणूकीत नेते यांनी डॉ.उसेंडींचा २ लाख ३६ हजारांनी पराभव केला होता. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये नेतेंचे मताधिक्य घसरले. परंतु टक्केवारीत फारसा फरक पडला नाही. खा. अशोक नेते हे अजातशत्रू व्यक्तीमत्व, उपद्रवशून्य मुल्यांकित  आणि व्यापक जनसंपर्क असलेले नेते, असल्यामुळे पक्षाला त्यांच्या हॅट्ट्रिक ची गॅरंटी असल्याने त्यांना २०२४ मध्ये बदलण्याचा अकारण प्रयत्न पक्ष करणार नाही. भाजपाकडून लोकसभेचे दुसरे दावेदार डॉ. देवराव होळी यांनी मागिल पाच वर्षात स्वतःची प्रतिमा एवढी मलीन केली की २०१९ ला काही रा.स्व. संघाच्या नेत्यांचे असलेले पाठबळही आता राहिले नाही. त्यामुळे लोकसभेचे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे धर्मराव आत्राम हे तयारी करून असले तरी त्यांचेसाठी काही अधिक कठोर भूमिका घेण्याची अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची सध्या तरी ताकद आणि मंशा नाही.

गडचिरोली- चिमुर लोकसभेसाठी भाजप महायुती, महाविकास आघाडी, नव्याने महाराष्ट्रात पाय रोवू इच्छिणारे आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समिती असे चार प्रमुख उमेदवार लढतीत असतील किंबहूना पाचवा तगडा उमेदवार समोर येऊ शकतो. मागिल लोकसभेत १५ लाख ८१३६६ मतदार होते. त्यापैकी ७२ टक्के मतदान झाले. त्यात नेते यांना ५ लाख १९ हजार ९६८ मते घेतली म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या ४५.५ टक्के. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत डॉ. रमेश गजभे ६६ हजार आणि १ लाखांहून अधिक मते घेत तिसरे प्रभावी उमेदवार ठरले. म्हणजे तिसरा प्रभावी उमेदवार मैदानात असला की भाजपच्या विजयाचे गणित सोपे होते. ही बाब लक्षात घेता चौकोनी लढत झाल्यास अशोक नेते यांना आपसूकच हॅट्ट्रिक करण्याची संधी प्राप्त होईल. सद्बायस्थितीत राज्य भाजपचे क्रमांक दोनचे नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अशोक नेतेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. भाजपच्या पक्ष संघटनेत नेतेंचेच पाठिराखे अधिक आहेत. भाजपच्या बाहेरही नेते यांना माननारा मोठा वर्ग लोकसभा क्षेत्रात आहे. या ऊलट स्थिती त्यांना आव्हान देणाऱ्यांपैकी जवळ जवळ सर्वांचीच आहे. कांग्रेस चे नेते डॉ. नामदेव उसेंडी हे घरी बसून राजकारणाचा सारीपाट हालवणारे, सोफिस्टीकेटेड, व्हाइट कॉलर्ड नेते म्हणून ओळखले जातात. कांग्रेसचे दुसरे दावेदार डॉ. नामदेव किरसान हे मागील एक वर्षापासून पायाला भिंगरी बांधल्यागत गडचिरोली लोकसभा पालथी घालताहेत. पण त्यांना काही सुर गवसताना दिसत नाही. राष्ट्रवादी आणि सध्या महायुतीचे मंत्री धर्मराव आत्राम याचा करिष्मा अहेरीच्या काही भागापर्यंत मर्यादित आहे. त्यातल्या त्यात अजित पवार गटाची येथे ताकद नाही. त्यापेक्षा अधिक शरद पवाराची माणसं आहेत. इतर पक्षांमध्ये आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समिती चा उदय हा काही अंशी प्रभाव टाकणारी ठरली तरी ती भाजपच्या पथ्यावरच पडेल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अशोक नेते यांना कसलाही धोका नसून त्यांचेच पारडे जड असल्याचे दिसून येते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!