संपादकीय

नेत्रदीपक सोहळ्यातून, राष्ट्रपतींच्या मेळ्यातून, राजकीय धुरिणांच्या धुळीतून जिल्हावासीयांना काही मिळेल!

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ४ जुलै

संपादकीय / हेमंत डोर्लीकर
देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी गडचिरोलीत येताना गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी काय घेऊन येणार आहेत. याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत जिल्ह्यात येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान समारंभा दरम्यान त्या बीजभाषण करणार आहेत. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने काही विशेष भूमिका मांडतात काय हे यानिमित्ताने पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऊल्लेखनीय आहे की राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी २००० या वर्षी भामरागड तालुका दत्तक घेतला होता. परंतु त्यानंतरही या दत्तक तालुक्याला सावत्र आईचेच प्रेम मिळाल्याचे आजही दिसून येते.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ हे राष्ट्रीय ख्यातीचे विद्यापीठ व्हावे, विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठ म्हणून मान्यता मिळावी, बांबू आणि सेरेकल्चर वर काम व्हावे, विद्यापीठाच्या शिक्षणातून रोजगारक्षम तरुण, तरुणी जिल्ह्याला मिळाव्या अशा शेकडो अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. जिल्ह्याच्या परिवर्तनाचा मार्ग विद्यापीठातून प्रशस्त व्हावा असे बोलणाऱ्यांची संख्याही अफाट आहे. यात राजकीय नेते प्रथम स्थानावर आहेत. परंतू एकीकडे शिक्षणातून विकासाची गंगा प्रवाहीत करणारी विद्यापीठातील शिक्षाविदांची स्थिती काय आहे? अगदी आरंभा पासूनच विद्यापीठ राजकारणाचा अड्डा बनला आहे. तत्पकालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी असा अड्डा बनवू नका असे आवाहन केले होते. परंतु प्रथम कुलगुरूंपासून ते विद्यमान कुलगुरू वादग्रस्त ठरले आहेत. सद्यस्थितीचे अवलोकन केले तर विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र कुलगुरू, अधिष्ठाता आणि काही प्रमुख शिक्षाविदांची प्रकरणं न्यायालयात आहेत. कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र कुलगुरू डॉ श्रीराम कावळे आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. ज्या जमिनीतवर कोनशिला ठेवली जाणार आहे. ती जमीन कित्येक दिवस वादग्रस्त ठरली होती. विद्यापीठाने आजपर्यंत वाटलेल्या आचार्य पदव्या सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य हे ध्वजप्रणाम एक, दोन, तीन वाले किंवा परिवारातील आहेत. अनेक नियुक्त्या वादग्रस्त आणि आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा राजकीय प्रभावाने झाल्याचा निरंतर आरोप होतो. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ खरेच राष्ट्रीय ख्यातीचे विद्यापीठ होईल?  जिल्ह्याच्या परिवर्तनाचा मार्ग विद्यापीठातून प्रशस्त होईल?  शिक्षणातून विकासाची गंगा प्रवाहीत करणारे ठरेल?
महामहीम राष्ट्रपती समवेत मा. राज्यपाल, देशभर देण्यासाठी ख्यातनाम केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्वतः मुख्यमंत्री जे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जिल्ह्यातील साध्या यात्रांसाठी कोट्यवधी रुपये देण्याची त्यांचीही दानत आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विद्यमान पालकमंत्री आहेत. तर नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही जिल्ह्याशी नाळ जुळलेली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे निर्माते म्हणून ज्यांचे नाव घतले जाते असे तेजतर्रार मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्यांनी नुकतेच गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी चंद्रपूर येथील उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून दिली, तथा गडचिरोलीचे असलेले आणि चौथ्यांदा मंत्री बनलेले धर्मराव आत्राम. ही सगळी वलयांकित मंडळी गोंडवानाच्या १० व्या दीक्षांत समारंभाच्या महामहीम राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला विशेष झळाळी येणार आहे. यापैकी सगळेच अधिकारवाणीने दाते आहेत. म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या या सोहळ्यातून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी काय मिळणार आहे. ही अपेक्षा ठेवून आहेत. अपेक्षा एवढीच की आजपर्यंत विद्यापीठाचा विकास ज्या पद्धतीने झाला ती बदलून खऱ्या अर्थाने, प्रामाणिकपणे विकासाची नवी वाट चोखारतील!
तुर्तास मर्यादेयविराजते !
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!