आलापल्ली अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या
समाजातून, राजकीय संघटनांकडून होत आहे तीव्र निषेध

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १४ जून
दोन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
शेकाप च्या नेत्या जयश्री वेडधा जराते यांनी सर्वप्रथम आलापल्ली येथील बलात्कार प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला असून त्या नराधमांवर एट्रासिटी लावून कठोर शिक्षा करावी अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आलापल्ली येथे एका शालेय शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा भाजप महिला मोर्चाने तीव्र शब्दांत निषेध केला असून भाजप महिला मोर्चाच्या नेत्या रेखा डोळस यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. पिडीतेला मनोधैर्य योजनेचा लाभ द्यावा, दक्षता समितीवर समाजात प्रभावीपणे काम , महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या महिलांची नियुक्ती करावी, बलात्कार अत्याचार प्रकरणी पोलीस विभागाने जनजागृती करावी, असे अनेक सुचना महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना केल्या.
वंचित बहूजन आघाडीने मंगळवारी गांधी चौकात आलापल्ली बलात्कार प्रकरणी सरकारचा जाहीर निषेध केला असून शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात मुली आणि स्त्रिया सुरक्षित नसल्याचे सांगत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष एड. कविता मोहरकर यांनी घटनेची तीव्र भर्त्सना केली असून पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी महिला कांग्रेस तिच्या समवेत ऊभी राहील. असे म्हटले आहे.