विनोद पटोलेंकडून अपहरणाचा प्रयत्न – कॉग्रेसच्या डॉ.सेलचे अध्यक्ष साळवे यांचा आरोप तर राईस मिल अवैध पणे विकण्याचा साळवेंचा प्रयत्न – विनोद पटोलेंचा आरोप
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ मार्च
धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील राईस मिल जबरदस्तीने हडपण्याच्या हेतूने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे भाऊ विनोद पटोले यांनी गावगुंडाच्या सोबतीने आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. प्रमोद साळवे यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. प्रमोद साळवे यांनी सांगितले की, शुक्रवारी चातगाव येथून गडचिरोलीकडे येत असताना बोदली गावाजवळ माझ्या कारसमोर अचानक एक कार थांबली. यावेळी दोन व्यक्तींनी मला कारबाहेर येण्यास सांगितले. बाहेर येताच आणखी दोन व्यक्तींनी मला शिवीगाळ करीत गाडीत बसण्यासाठी जबरदस्ती करीत माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या कटेझरी येथील राईस मिल विक्रीचा सौदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष यांचे मोठे भाऊ विनोद पटोले यांच्यासोबत तोंडी सौदा झाला होता. त्यावेळी सहा महिन्यात पैसे देण्याचे ठरले होते, मात्र तसे न झाल्याने नियमाप्रमाणे मी सौदा रद्द करीत यासंदर्भात कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. दरम्यान पटोले यांनी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक दामोधर मंडलवार, सुमीत कोठारी, छगन शेडमाके याना घेऊन माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. साळवे यांनी यावेळी केला. दरम्यान दोघांनीही एकमेकांवरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
साळवेंचे सर्व आरोप खोटे,बदनामीचा प्रयत्न : विनोद पटोले
प्रमोद साळवे यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सपशेल बनावट असून आपले पाप लपविण्यासाठी ते बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असे विनोद पटोले यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. सदर प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती देतांना पटोले यांनी सांगितले की, कटेझरी येथील राईस मिल खरेदीसाठी ५१ लाखांचा सौदा झाला होता. या सौद्यापोटी आपण वेळोवेळी आतापर्यंत साळवे तसेच त्यांची बहिण अल्का रामने यांच्या खात्यात २५ लाख रुपये जमा केले आहेत. मात्र, सदर राईस मिल अकृषक व औद्योगिक प्रयोजनाकरिता वापरायोग्य परिवर्तीत करणे गरजेचे होते. त्यामुळे यासाठी त्यांनी वेळ मागितला. सदर कार्यवाही झाल्यानंतर राईस मिल पंजिबद्ध विक्री नोंदणी करण्याचे ठरले होते. मात्र दरम्यानच्या कालावधीत त्यांनी बंद ठेवलेल्या राईस मिलचे कुलूप तोडून मिलचा त्यांनी ताबा घेतला. कोंडा विकला तसेच सौदा रद्द करीत असल्याचे सांगून राईस मिल विकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
आपण केवळ पटोले साहेबांसोबत असल्यामुळे आपले नाव गोवले
साळवेंच्या तक्रारी मधील सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक दामोदर मंडलवार यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की मी पटोले साहेबांच्या गाडीजवळ ५० मीटरपेक्षा जास्त अंतरावर ऊभा होतो. त्यामुळे साळवे सर्रास खोटे बोलत आहेत. पटोले साहेबांनी साळवेंना कसलीही शिवीगाळ केली नाही किंवा साधे जोरात सुद्धा बोलले नाहीत. राईस मिलच्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र साळवेंची नियत फिरली असल्याने त्यांनी अपहरणाचा बनाव करून पोलीस तक्रार केली आहे. तपासात सत्य बाहेर येईलच. डॉ. साळवे यांचेवर धानोरा पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार गुन्ह्यात ते अजूनही आरोपी आहेत. आपण केवळ पटोले साहेबांसोबत असल्यामुळे आपले नाव गोवले आहे. असेही त्यांनी सांगितले