गडचिरोलीचे जिल्हाधिकारी हटवा
वंचित बहुजन आघाडीची विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांच्याकडे मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१४ फेब्रुवारी
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांचेकडून नागरिकांना अपमानजनक वागणूक दिली जात असुन नागरिकांच्या समस्यांसंदर्भात ते काम माझे नाही असे सांगतात. त्यामुळे अशा असंवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हटविण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
शिवसेना पक्षाचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी सर्किट हाऊस येथे भेट घेऊन जिल्हाधिकारी हटावचे निवेदन दिले व जिल्हाधिका-यांच्या हुकूमशाही व अरेरावीपणावर सविस्तर चर्चा केली .
दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सामाजीक व राजकिय कार्यकर्ते संविधानिक अधिकार व हक्कासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाधिका-यांना भेटावयास वा निवेदन देण्यास गेले असता जाणा-यां व्यक्तींशी वा समुहांशी उध्दटपणे अरेरावीची भाषा बोलून हुसकावून लावत असल्याचे अनूभव जिल्ह्यातील अनेक सामाजीक – राजकिय कार्यकर्ते व पत्रकार यांना सुध्दा आले आहेत .
नुकतेच समाज कल्याण अंतर्गत शहरातील वसतीगृहात राहणा-या शेकडो विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्तांकडून समस्या मार्गी न लागल्यामूळे जिल्हाधिका-यांना संवेदनशिल समस्या घेऊन भेटावयास गेले असता तुम्ही येथे कशाला आलेत, तुम्ही पुण्या मुंबईला जा , समाज कल्य़ाण माझ्या अखत्यारीत येत नाही अशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली व त्यांना हुसकावून लावले .
जर जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारीच दाद देत नसतील व अत्यंत संवेदनशिल समस्यांवर असंवेदनशीलपणा दाखवत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसहीत सर्वसामान्यांना पडला आहे त्यामूळे असंवेदनशीलपणाचा कळस गाठणा-या जिल्हाधिका-यांना तात्काळ हटविण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा जिल्हाधिकारी हटविण्यात यावे असे निवेदन देण्यात आले .
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, संगटक भिमराव शेंडे, उपाध्यक्ष जी. के. बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, युवा नेते चंदू नैता़म, मिडीया प्रमुख जावेद शेख, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे, भोजराज रामटेके, दिलीप बांबोळे, भारत रायपूरे, सोमनाथ लाकडे, मुकेश शेंडे, रवी निकोडे, दिपक कोसमशिले, जानकिराम भुरसे, गोविंदा शेंडे, प्रभाकर जुनघरे, पुरुषोत्तम नंदगिरवार आदि उपस्थित होते.