क्राईम स्टोरी

नक्षलवाद्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ जानेवारी 

नक्षलवादी असल्याचे सांगून एका बांधकाम कंत्राटदाराला ६० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नीतेश मट्टामी (२६) व गणू नरोटे (४२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही चामोर्शी तालुक्यातील माडे आमगाव येथील रहिवासी आहेत.

या प्रकरणात एकूण ६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४ जण फरार आहेत. प्राप्त माहितीनुसार धानोरा तालुक्यातील पेंढरी पोलिस मदत केंद्रांतर्गत सावंगा गावाजवळ  निर्माणाधीन पुलाच्या बांधकामस्थळी  ९ डिसेंबर रोजी सहा जण गेले. त्यांनी मजुरांना धमकावून मारहाण केली. त्यानंतर मजुरांकडील मोबाईल हिसकावून ६० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास वाहनांची जाळपोळ करून कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकीही दिली. या संपुर्ण प्रकारामुळे भयभीत झालेल्या कंत्राटदाराने गावकऱ्यांना आपबिती सांगितली. पुढे गावकऱ्यांनी खंडणी मागणारे नेमके नक्षलवादीच आहेत काय, याविषयी शोध घेतला. मात्र, भलतीच माहिती पुढे आली. त्यानंतर गावकऱ्यांनी १२ जानेवारीला आरोपींना खंडणीची रक्कम घेण्यासाठी बोलावले तेव्हा ते नक्षलवादी नसल्याची खात्री पटताच दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पेंढरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उर्वरित चार जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!