कृषी विभागाचे वरिष्ठ लिपिक व तालुका कृषी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
पूर्णसत्य प्रतिनिधी | गडचिरोली, दि. ७ डिसेंबर
लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना चाळीस हजारांची लाच घेतानी रंगेहाथ अटक केली आहे. गडचिरोली येथील संदीप अशोकराव वैद्य , वय ३३ वर्ष, वरिष्ठ लिपीक, लेखा विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली, आणि प्रदीप पुंडलीक वाहाने, वय ४९ वर्ष, तालुका कृषी अधिकारी, अति. प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली, अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्व्हेस्टर खरेदी केल्याने अनुदानाची रक्कम रुपये अकरा लाख त्यांचे बँक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून आरोपी संदीप अशोकराव वैद्य यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती स्वत: व उपविभागीय कृषी अधिकारी यांचेसाठी ४० हजारात तडजोड झाली . फिर्यादीच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ४० हजारांची रुपये लाच रक्कम स्विकारतांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील चंद्रपूरकडे जाणा-या मुख्य रस्त्याचे बाजूस असलेल्या चंद्रप्रकाश गेडाम यांच्या चहाटपरी येथे वैद्य रंगेहाथ पकडले गेले. तसेच वैद्य यांनी स्विकारलेल्या लाच रक्कमेस उपविभागीय कृषी अधिकारी यांनी सहमती दर्शवून लाच रक्कम रुपये ४० हजार रुपयांपैकी २० हजार रुपये पंच साक्षीदारासमक्ष उपविभागीय कृषी कार्यालय गडचिरोली येथे स्विकारल्याने दोन्ही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. बातमी लिहून होईस्तोवर गडचिरोली येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर , ला.प्र.वि. नागपूर, मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली यांच्या नेतृत्वात पो.नि. शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगीरवार, स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजारकर, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकूर, संदीप उडाण , मपोशि जोत्सना वसाके गडचिरोली यांनी केली आहे.