धरणांच्या पाण्याने जिल्ह्याला पुराचा तडाखा, जनजीवन विस्कळीत
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ ऑगस्ट
गुरुवारी व शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली; त्यामुळे पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने भामरागड़ात शिरलेला पूर कमी झाला. मात्र धरणांतून पाणी सोडल्याने वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी नदीला पूर आला. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर आणखी किती दिवस राहणार हे अनिश्चित आहे.
गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलजवळच्या दर्याजवळ असलेल्या खोलगट रस्त्यावर कठीण नदीला जाऊन मिळणारे पाणी साचले असल्याने गुरुवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. कोणी जबरदस्तीने वाहन टाकून अपघात होऊ नये यासाठी पोलिसानी बरिकेड्स लावून हा मार्ग बंद केला होता. देसाईगंज शहराच्या जवळूनच वैनगंगा नदी वाहते आहे. या नदीला मिळणारे नाले शहरलगतच आहेत. वैनगंगेचा दाब वाढून नदीचे पाणी असल्याने ह्या नदीचा दाब वाढल्याने ओढ्याच्या पाण्याला थोप येऊन ते पाणी शहरातील हनुमान वॉर्डातील नाल्यालगत वसलेल्या जवळपास २० घरामध्ये पाणी शिरले. आपत्ती व्यवस्थापनाने त्या कुटुंबाचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. लाखांदूर मार्ग सावंगी जवळ बंद झाला. तसेच सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीला पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका शेतीला बसला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.