आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरण दडपणाऱ्यांना सोडणार नाही : चित्रा वाघ
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १४ नोव्हें.
महिनाभरापूर्वी एटापल्ली तालुक्यातील येलचील परिसरात एका आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने केलेला बलात्कार दुर्दैवी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली. महिला अत्याचाराच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही हे स्पष्ट करतानाच पीडित महिलेला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरू झाल्यापासून त्या परिसरात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच २९ सप्टेंबरला एका आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने बलात्कार केला. संबंधित ट्रक सूरजागड लोहखानिशी निगडित असल्याने प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र, माध्यमांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी तडकाफडकी कारवाई करत दोषी ट्रक चालकाला अटक केली. मात्र, यासंदर्भात माहिती देण्यास ते तयार नव्हते. याबाबत चित्रा वाघ यांना प्रश्न केल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. महिला अत्याचारासंदर्भात राज्यातील सरकार प्रभावी उपाययोजना करीत असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. याविषयी सखोल माहिती घेऊन प्रकरण दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच पीडित महिलेला शासनाच्या मनोधैर्य योजनेतून व भाजप महिला मोर्चाकडून शक्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजप महिला आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याकरीता प्रत्येक बुथवर २५ महिलांची टीम ऊभी करणे हे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्या समजून घेतल्या यात आरोग्य, शिक्षण, महिला ऊत्पीडन आणि सुरजागड खाणीमुळे होणारे नुकसान असे प्रमुख मुद्दे होते या सर्व समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.
मंत्री संजय राठोड अजूनही आरोपीच्या पिंजऱ्यातच न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड हे अजूनही आरोपीच्या पिंजऱ्यातच असून त्यांच्याविरोधात आपला न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गडचिरोली येथे केले.
सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ महिला मेळाव्यानिमित्त गडचिरोलीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वी यवतमाळ येथे संजय राठोड यांच्याबाबत एका ज्येष्ठ पत्रकाराने प्रश्न विचारताच चित्रा वाघ आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. यावरून मोठा वादही झाला. याचे पडसाद वर्धा जिल्ह्यातही उमटले. तेथील पत्रकारांनी वाघ यांच्या पत्रपरिषदेवर बहिष्कार टाकला. आज गडचिरोलीतील पत्रकार परिषदेत प्रस्तुत प्रतिनिधीने यासंदर्भात केलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. आपण संजय राठोड प्रकरणी अजूनही ठाम असून हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यापुढेही ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.