पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० ऑगस्ट
जंगलात गुरे चारावयास गेलेल्या महिलेस वाघाने ठार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील पोल वनपरिक्षेत्रांतर्गत चुरचुरा या गावी घडली. पार्वताबाई नारायण चौधरी (५५) रा. चुरचुरा, असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसातील दुसरी घटना असून सोमवारी आरमोरी तालुक्यातील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते.
पार्वताबाई ही आपल्या पतीसह गुरे चराईचे काम करीत होती. दोघेही आज सकाळी गुरे चारावयास जंगलात गेले होते. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गावाकडे परत येताना पार्वताबाई मागे, तर तिचा पती पुढे निघून गेला होता. एवढ्यात वाघाने पार्वताबाईवर हल्ला करून तिला ठार केले. बराच वेळ होऊनही पत्नी येताना दिसत नसल्याचे बघून पती मागे गेला असता त्यास वाघाने कुणालातरी ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. त्याने आरडाओरड केल्यानंतर गावकरी धावून गेले असता जंगलात पार्वताबाईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आर. बी. मडावी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून पार्वताबाईच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
आतापर्यंत पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघांनी ९ जणांना ठार केले आहे. यंदाचा हा तिसरा बळी आहे. वाघाच्या हल्ल्यांमुळे नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.