नक्षल्यांना स्फोटके पुरविणारा मुख्य सूत्रधार अटकेत ; तामिळनाडूतून घेतले ताब्यात
१९ फेब्रुवारी रोजी स्फोटके बनविण्याचे साहित्य केले होते जप्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २३ ऑगस्ट
पोलिसांनी अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा गावातून मोठ्या प्रमाणात स्फोटके बनविण्याचे साहित्य जप्त केले होते. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला पकडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून त्याला तामिळनाडूतील सालेम येथून ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीनिवास मुल्ला गावडे, रा. भांगरामपेठा, असे अटक करण्यात आलेल्या नक्षल समर्थकाचे नाव आहे.
१९ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलिसांच्या पथकाने अहेरी तालुक्यातील भांगारामपेठा गावात केलेल्या कारवाईत स्फोटके बनविण्याचे साहित्य जप्त केले होते. चौकशीनंतर चार आरोपींना अटक कण्यात आली होती. मात्र, मुख्य सूत्रधार फरार झाल्याने त्याला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर गडचिरोली पोलिसांनी तामिळनाडूमधील सालेम येथे मुख्य आरोपी श्रीनिवास गावडे ह्याच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.